जनतेलाच पिचड नको …. अकोल्यात शिवसेनेत फूट !

Published on -

अकोले : पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांनी युती धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांना समर्थन देत पिचडांच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पत्रकार परिषदेत मेंगाळ व दराडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारत आपला जाहीर पाठींबा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांना दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पंचायत समितीवर शिवसेनेचे सभापती व उपसभापती हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. पिचड भाजपत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे पं. स. सदस्यही भाजपत गेले.

भाजप व सेनेची युती आहे, तरीही उपसभापती मेंगाळ व सेनेचे नेते दराडे यांनी पिचडांच्या विरोधात भूमिका घेतली. याचा फटका भाजपचे उमेदवार वैभव पिचडांना बसणार आहे. उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये म्हणाले, अकोल्याची जागा सेनेकडे होती, पण ती भाजपला सोडण्याचा निर्णय माझा आहे.

आपल्या भल्यासाठी तो घेतला. ठाकरे यांच्या खुलाशावर सेना पदाधिकारी समाधानी नाहीत. त्यांनी आपला पाठिंबा राष्ट्रवादीला दिल्याचे जाहीर केले. लहामटे यांना पाठिंबा जाहीर करताना दराडे व मेंगाळ यांनी ठाकरे यांची माफी मागितली.

ते म्हणाले, जनतेलाच पिचड नको आहेत. गेल्या ४० वर्षांपासून भावनेच्या भरात जी चूक आम्ही व तालुक्यातील लोक करत आलो आहेत, ती यावेळी दुरुस्त केली नाही, तर पुढच्या पिढी आम्हाला माफ करणार नाहीत.

त्यामुळे आम्ही कट्टर शिवसैनिक असूनही शिवेसेनाप्रमुख आम्हाला नक्कीच माफ करतील. शिवसेनेतील या दुफळीमुळे तालुक्यातील निवडणुकीची समिकरणे बदलणार असून सध्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झालेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News