बिबट्याची नेवासा तालुक्यात पुन्हा एंट्री

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे पुन्हा एकदा बिबट्याचे आगमन झाले असून शनिवारी रात्री बिबट्याने कुत्रे फस्त केले. महालक्ष्मी हिवरा परिसरामध्ये बिबट्याचे भय थांबता थांबेना.

काही महिन्यांपूर्वी परिसरातील सांगळे मळ्यात अभय शिरसाट या बालकावर हल्ला केला होता. त्यानंतर राजेंद्र गायके यांच्या वासरावर हल्ला केला होता. तसेच बोरुडे यांच्या वस्तीवर गोठ्यातील कालवडीवरही हल्ला केला होता.

यापूर्वी केदार वस्तीवर एक बिबट्या तर दोनच दिवसांपूर्वी चांदा येथील मुथा फार्म शेजारी एक बिबट्या जेरबंद झाला होता. चांदा महालक्ष्मी हिवरा परिसरामध्ये अजून तीन ते चार बिबटे असण्याची शक्यता या भागातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!