शेतीची मशागत महागली! आणि ट्रॅक्टर चालकांचे दरही गगनाला भिडले ..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. त्यासोबतच जमिनीमध्ये कडकपणा वाढला. अशा परिस्थितीत शेतजमीन भुसभुशीत करणाऱ्या बैलजोडीची ताकदही कमी पडू लागली. यामुळे बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरने मशागत करण्याचे प्रमाण वाढले.

यातून शेतकऱ्यांचे मशागतीचे गणित परावलंबी झाले. पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बैलजोड्या होत्या. अलीकडे त्यांच्या सांभाळण्याचा खर्च वाढत गेला.

याशिवाय चारापाणी आणि रखवालीसाठी न मिळणारे मजूरवर्ग, यामुळे शेतकऱ्यांनी बैलजोडया कमी केल्या. त्याची जागा झटपट काम पूर्ण करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतली. दरवर्षी ट्रॅक्टरवर मशागतीची जबाबदारी वाढत आहे.

आतातर संपूर्ण क्षेत्रच ट्रॅक्टरने मशागत होत आहे. बैलजोडीवर मशागत करायची असेल तर मोठा विलंब लागतो. याशिवाय शेतजमीन चिकट आल्यामुळे बैल पुढे सरकत नाही. आता ट्रॅक्टर हा अखेरचा पर्याय आहे.

ट्रॅक्टर चालकांनी या क्षेत्रात मोठी कमाई असल्याने गावामध्ये ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चही वाढला आहे. हे दर शेतकऱ्यांना सध्या न परवडणारे असेच आहेत.

मात्र, त्याला पर्याय नाही. उन्हाळवाई नांगरट करताना दोन फाळी अथवा तीन फाळी या अवजारांच्या मदतीने वाई करण्यात येते. यासाठी तासाप्रमाणे अथवा एकराप्रमाणे दर ठरले आहेत.

उन्हाळवाई करण्यासाठी राजस्थानी आणि पश्चिम महाराष्ट्रातील ट्रॅक्टरचालकांनी जिल्ह्याकडे आगेकूच केली आहे. त्यांचे दर स्थानिकांपेक्षा अधिक आहेत. रोटावेटर, वखरवाई, पेरणी, या सर्वच बाबींचे दर ट्रॅक्टर चालकांनी वाढविले आहेत.

विशेष म्हणजे, प्रत्येक गावात याचा दर वेगळा आहे.माणसं काम करण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. यामुळे सर्व कामे यंत्रांकडून करावी लागत आहेत. जमिनीचे क्षेत्र पाहता उपलब्ध यंत्रणा अपुरी आहे. यामुळे ट्रॅक्टर चालकांचे दर गगनाला भिडले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment