आ. कोल्हेंचे काम २५ वर्षे आमदार असलेल्यांनाही सरस-ना. मुनगंटीवार

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : अर्थमंत्री म्हणून मी एकटाच आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्रिमहोदयांचे पाठबळ आहे. त्यांचे विधिमंडळातील गेल्या पाच वर्षाचे काम पंचवीस वर्षे आमदार असलेल्यांना सरस आहे. तेव्हा सर्वांचं चांगभलं करून विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आमदार स्नेहलता कोल्हे यांना पुन्हा विधिमंडळात पाठवा. येथील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवितो, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणतांबा गोदावरी लॉन्स येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाधर चौधरी होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, गोदावरी खोऱ्यात पश्चिमेचे पाणी वळविणे, शेती सिंचन कालवे नुतनीकरण, निळवंडे धरण व कालव्याची कामे युती शासनाने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सिंचन समृद्ध करण्याचा ध्यास देण्यासाठी आपण येथे आलो. वंचित घटकांना येथे घरकुलासाठी जागा हवी आहे. शेती महामंडळाची जमीन या भागात मोठ्या प्रमाणात असून, त्यावर निश्चित मार्ग काढून हा प्रश्न सोडवू. राज्यात महायुतीचं बियाणं पेरलं, तर महायुतीचं विकासाचंच पीक येईल.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता वयोवृद्ध झाले आहेत. ज्यांनी आजवर स्वहितासाठी सत्ता राबवून गोरगरीब सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्नांची माती केली, सत्तेची मस्ती करत महाराष्ट्राची वाट लावली आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यात सिंचन पाण्याची समृद्धी यापूर्वीच्या महाआघाडीच्या शासनाला आणता आली नाही. २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचा निवारा हा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे. तो महाराष्ट्रात सर्वार्थाने सार्थ करू. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्याची या राज्याचा वित्तमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे.

आमदार कोल्हे म्हणाल्या, पुणतांब्याची पाणी योजना गेल्या कित्येक वर्षांपासून रखडली होती, पण वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून १६ कोटी ५० लाख रुपये दिले. यासह अनेक छोटे-मोठे विकासाचे प्रश्न सोडविले. आज पुणतांबा परिसरात काही मंडळी विश्वासघाताने मते मागत आहे. त्यांना मतदारच धडा शिकवतील. माजी संचालक धनंजय जाधव म्हणाले, पुणतांबा शेतकरी आंदोलनाच्या वेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेत राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी देवून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment