मुंबई मेट्रोच मराठी माणसाचा घात करणार : राज ठाकरे

Ahmednagarlive24
Published:

मुंबई: मेट्रोच मराठी माणसाचा घात करणार असा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी प्रभादेवीच्या सभेत केला. आरेचं जंगल एका रात्रीत नष्ट केलं. हे सरकार तुमच्या इच्छा आकाक्षांवर वरवंटा फिरवतं आहे. पायाभूत सुविधांच्या नावाखाली मेट्रो आणली जाणार, मग जागांचे भाव आणखी वाढत जाणार.

या जागा मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर जाणार, गेलेल्या आहेतच. मेट्रो आल्यावर आणखी दर वाढणार, सरकत सरकत तुम्ही मुंबईच्या बाहेर पडणार. कल्याण डोंबिवलीला जाणार. तिथे जागा नाही म्हणून आणखी पुढे जाणार, अरे बाबांनो असं करु नका नाहीतर सरकत सरकत उझबेकिस्तानला जाल असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

आरेच्या बाबतीत हे सरकार रात्री खून करणारं रामन राघव सरकार आहे असाही घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला. आरेच्याबाबतीत कोर्टाने शुक्रवारी निर्णय दिला. एका रात्रीत २७०० झाडं तोडण्यात आली. आपण त्याबाबतही काहीही बोलत नाही.

तुम्ही मुंबईतल्या जागांचे मालक आहात आणि सरकारच्या स्वार्थी कारभारापुढे तुम्ही गप्प बसणार. या सरकारचा कारभार नादान आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. दादर, प्रभादेवी, परळ, लालबाग या ठिकाणी आता भाषा बदलू लागली आहे. मराठी भाषा कमी होते आहे हिंदी भाषिक जास्त दिसत आहेत.

शिवाजी पार्क मैदानाची भाषा बदलू लागली आहे संध्याकाळी गेल्यावर तुम्हाला कानावर कोणती भाषा येते ते ऐका. जे तुमच्या हक्काचं आहे तेही तुम्हाला टिकवता येत नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. ” मेट्रो मराठी माणसाचा घात करणार, मी हे वाक्य विरोधासाठी विरोध करायचा म्हणून उच्चारलेलं नाही.

मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. मात्र ही मेट्रो मराठी माणसाचा घात करणार, अशा प्रकारचं दळणवळण वाढलं की जागांचे भाव आणखी वाढतात. शहरांमध्ये गर्दी होऊ नये गर्दी बाहेर जायला पाहिजे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ते कुठेही होताना दिसत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मेट्रोसाठी तुम्हाला चिरडणार आणि आरेमधली झाडंही चिरडून टाकली असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment