Ahilyanagar News : कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, संत जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर आणि साईबाबा तपोभूमी मंदिर या तीन प्रमुख धार्मिक स्थळांवर गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट येथे ९ व १० जुलै २०२५ रोजी प. पू. आत्मा मालिक माऊली यांच्या सान्निध्यात दर्शन, ध्यान, सत्संग, प्रवचन आणि महाप्रसाद यासारखे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
देश-विदेशातून लाखो भाविक येणार

या पवित्र गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी सुमारे दीड ते दोन लाख भाविक देश-विदेशातून कोपरगाव परिसरात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर तसेच रस्त्यावरही भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी होणार आहे.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या समोरूनच अहिल्यानगर-मनमाड महामार्ग जात असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१० जुलै २०२५ रोजी सकाळी ६ ते रात्री ११:५५ वाजेपर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतून जाणारी संपूर्ण जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.
पर्यायी मार्ग व्यवस्था खालीलप्रमाणे:
अहिल्यानगरहून मनमाडकडे जाणारी जड वाहतूक:
कोल्हार → तळेगाव दिघे → झगडे फाटा → मोर्गे → कोपरगाव
मनमाडहून अहिल्यानगरकडे येणारी जड वाहतूक:
पुणतांबा फाटा → झगडे फाटा → तळेगाव दिघे → कोल्हार → अहिल्यानगर
किंवा
पुणतांबा फाटा → वैजापूर → गंगापूर → नेवासा फाटा → अहिल्यानगर
अत्यावश्यक सेवांना सूट : ही वाहतूक मर्यादा शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि स्थानिक प्रशासनाने विशेष कारणासाठी परवानगी दिलेल्या वाहनांवर लागू राहणार नाही.
नागरिकांसाठी प्रशासनाची विनंती : या दिवशी कोपरगाव परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनधारकांनी वरील पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती कोपरगाव पोलिसांकडून करण्यात आली आहे. धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे बदल आवश्यक असून सर्वांची साथ महत्वाची आहे.