शनि शिंगणापुर देवस्थानच्या नावाने ऑनलाईन फसवणूक ! गुन्हा दाखल, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

Published on -

अहिल्यानगर, १२ जुलै २०२५: श्री. शनैश्वर देवस्थान, शनि शिंगणापुर (ता. नेवासा) या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या नावाने काही बनावट अॅप्स आणि वेबसाईट्सवरून भाविकांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन येथे अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ४ जून २०२५ रोजी श्री. शनैश्वर देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात देवस्थानाच्या नावाने बनावट अॅप्सवरून VIP दर्शन, ऑनलाईन पूजा, अभिषेक व तेल चढावा बुकींगच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळण्यात आल्याचा उल्लेख होता.

सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी सायबर पोलीस स्टेशनने केली असता फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात भाविकांकडून मिळालेल्या इतर दोन तक्रारींचा देखील समावेश करण्यात आला. परंतु देवस्थान प्रशासनाने वेळोवेळी सूचना मिळाल्यानंतरही अधिकृत तक्रार दाखल केली नव्हती.

शेवटी, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि भाविकांची अधिक फसवणूक होऊ नये म्हणून चौकशी अधिकारी पो. उपनिरीक्षक श्री. सुदाम काकासाहेब काकडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार सरकारतर्फे पुढाकार घेत गुन्हा दाखल केला.

या बनावट संकेतस्थळे व अॅप्समध्ये खालील URL चा समावेश आहे:

  • https://gharmandir.in
  • https://onlineprasad.com
  • https://pujapariseva.com
  • https://hariom.app/home/DEFAULT
  • https://epuja.com

या संकेतस्थळांच्या अज्ञात मालकांनी श्री. शनैश्वर देवस्थानची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता भाविकांकडून अनियमित दराने ऑनलाईन बुकींग करून आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकरणी शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. १६५/२०२५, भारतीय नवसंहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाविकांसाठी महत्वाचे आवाहन:
श्री. शनैश्वर देवस्थान, शनि शिंगणापुरमार्फत कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन दर्शन, अभिषेक, पूजा, VIP दर्शन किंवा तेल चढावा बुकींगची सेवा सध्या देण्यात येत नाही. त्यामुळे कुठल्याही अॅप्स किंवा संकेतस्थळांवर विश्वास ठेऊन पैसे भरू नयेत. फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मोरेश्वर पेंदाम व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!