अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आक्रमक प्रचार करत आघाडी घेतली आहे. मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम, बैठका आणि रॅलींच्या माध्यमातून युतीकडून प्रचाराची धार वाढवण्यात आली आहे.
या प्रचाराला अधिक गती देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती उमेदवारांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू द ग्रेट खली अहिल्यानगर शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचारात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे वेधले गेले आहे.

या भव्य प्रचार रॅलीचे नेतृत्व डॉ.सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शना खाली होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी युतीने प्रचारात शिस्तबद्ध नियोजन, कार्यकर्त्यांचा जोश आणि विकासाचा अजेंडा पुढे ठेवत आघाडी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच युतीचा प्रचार अधिक संघटित आणि प्रभावी होत असून, शहराच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजता माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरापासून दिल्ली गेटपर्यंत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून निघणारी ही रॅली प्रचारातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या रॅलीमुळे मतदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून, युतीच्या विकासात्मक भूमिकेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या भव्य प्रचार रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.













