अहमदनगर:- जागतिक दर्जाच्या नेत्रोपचारांनी सुसज्ज असलेल्या जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी नेत्रालयात राज्यभरातील नेत्ररूग्णांवर परिणामकारक उपचार करण्यात येतात.नेत्रालयातील या सेवेमुळे नुकतीच १०० वर्षांच्या वयोवृध्द आजीला नवी दृष्टी मिळाली आहे.
अधू झालेल्या डाव्या डोळ्याने प्रथमच लख्खपणे सर्वांना पाहताना आजीच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी घरातील आपल्या नातलगांनाही त्या पाहू शकत नव्हत्या.आनंदऋषीजी नेत्रालयाच्या रुपाने देवाचीच कृपा झाल्याची भावना या आजींनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात अत्याधुनिक नेत्रोपचार सुविधा मिळण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालयातर्फे विशेष तपासणी व उपचार शिबिरे घेण्यात येतात.याअंतर्गत चागंतपुरी येथे झालेल्या नेत्रशिबिरात शेवगाव तालुक्या तील सुलतानपूर येथील प्रयागाबाई बालाजी मरकड या १०० वर्षांच्या आजी तपासणीसाठी आल्या होत्या प्रयागाबाई यांच्या उजव्या डोळ्यातील मोतीबिंदू चार वर्षांपासून पूर्ण पिकलेला होता.
डावा डोळाही खराब झाल्याने त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसणे जवळपास बंद झालेले होते.गावातील शिबिरात तपासणी केल्या नंतर त्यांना उपचारांसाठी नगरला आनंदऋषीजी नेत्रालयात आणण्यात आले.त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे खूप गुंतागुंतीचे होते.
कृत्रिम भिंग बसण्याचीही शक्यता कमी होती.परंतु डॉ.संदीप राणे यांनी आपले पूर्ण कौशल्य व अनुभव पणाला लावून आजीच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.शस्त्रक्रियेनंतर दुसर्या दिवशी आजींच्या डोळ्यावरील पट्टी काढ ण्यात आली. डोळ्यांनी सर्वकाही लख्ख दिसू लागल्याने त्यांचा चेहरा चांगलाच खुलला.