अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सेवा सोसायटीच्या तत्कालीन सचिवाने शेतकर्यांची कर्जाची मागणी नसतांना देखील त्यांच्या नावावर परस्परच कर्ज घेऊन लाखोंचा गैरव्यवहार केला होता.
या प्रकरणाची चौकशी होऊन कोरेगव्हाण सोसायटीचा तत्कालीन सचिव संदीप सोपाना मापारे यास अहमदनगर जिल्हा स्तरीय समिती सचिव सुदाम रोकडे यांनी दि. 6 रोजी निलंबन कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कोरेगव्हाण येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये तत्कालीन सचिवाने संस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाची दिशाभूल करत तब्बल 23 शेतकर्यांच्या नावावर परस्पर तेरा लाख एकतीस हजार तीनशे एकोणनव्वद रुपये रूपयांचे कर्ज काढले होते.
हा गैरव्यवहार उघड झाला, व या प्रकरणी श्रीगोंदे सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार देखील प्राप्त झाली. या तक्रारीची श्रीगोंदे येथील सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी चौकशी करून तसा अहवाल अहमदनगर येथील जिल्हा स्तरीय समिती व जिल्हा उपनिबंधक यांना सादर केला होता.
त्यानुसार सचिव संदीप मापारे याच्याकडून ती गैरव्यवहार केलेली रक्कम वसूल करण्यात आली होती. मापारे याने शेतकर्यांच्या नावावर परस्पर सव्वा तेरा लाख रुपये उचलल्याचा गैरव्यवहार सिद्द झाला होता.
त्यानुसार अहमदनगर जिल्हा स्तरीय समितीचे सदस्य सचिव सुदाम रोकडे यांनी दि. 6 रोजी कोरेगव्हाण सेवा सोसायटीचा तत्कालीन सचिव संदीप सोपाना मापारे यास सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved