Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये १० टक्के परताव्याच्या आमिषाने कमी काळात अधिक पैसा कमविण्याच्या नादात नगर जिल्ह्यातील अनेकजण कामाला लागले आहेत. त्यात अनेक डॉक्टर, वकील, शिक्षक आणि आमदार खासदारांसह अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत.
मात्र बदनामीच्या भीतीपोटी कोणी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे, अनेकांचे पैसे गुंतून देखील गप्प बसण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. जिल्ह्यातील शेवगाव येथील अनेकांचे कोट्यवधी रुपये यात गुंतले आहेत.

मात्र अजूनही अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत आहेत. नुकताच असाच प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. यात तिघांना तब्बल ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत कुशादेव बेझबुराह (रा. जनपुर, दिल्ली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील दत्तात्रय शंकर पवार याची कुशादेव सोबतओळख झाली होती. तेव्हा कुशादेव याने त्याला ट्रेडिंगबाबत चांगले ज्ञान असल्याचे सांगत जर तुम्ही १० ते १५ लाखांची गुंतवणुक केली.
तर, दोन दिवसात १० टक्के परतावा मिळून देण्याचे आमिष दाखवले होते. परंतु पवार यांनी त्यास नकार दिला. मात्र, कुशादेव याने पवार यांना तुम्ही जेवढी रक्कम मला देताल, त्या रकमेचे चेक मी तुम्हाला अगोदर देतो कबुल केले . तेव्हा पवार यांना विश्वास आला. त्यांनी कुशादेव याच्या फेडरल बँकेच्या खात्यावर १५ लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर पुन्हा १० लाख रुपये काही दिवसांनी वर्ग केले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पुन्हा १० लाख वर्ग केले.
या दरम्यान, कुशादेव याने पवार यांच्या खात्यावर ३ लाख, नंतर ५६ हजार आणि त्यानंतर १० लाख टाकले. पवार यांनी कुशादेवच्या खात्यावर १ कोटी १२ लाख आणि रोख २५ लाख असे १ कोटी ३७ लाख रुपये गुंतवणुक केली होती. त्यापैकी फक्त ५३ लाख रुपये पवार यांना मिळाले आहेत.
दरम्यान पवार यांनी त्यांचे मित्र अंकुश जनार्दन नरवडे यांनी देखील १ कोटी ९२ लाख ६७ हजार ७५० रुपये बँकेत आणि २० लाख रोख ही रक्कम याच कुशादेवकडे ट्रेडिंगसाठी दिले होते. त्यातील १ कोटी २६ लाख ९७ हजार नरवडे यांना परत मिळाले. त्यानंतर नरवडे यांचे मित्र शरद काशिनाथ जेडगुले यांनी देखील कुशादेवच्या खात्यात १३ लाख ४० हजार रुपये आणि रोख ५ लाख दिले होते.
त्यापैकी ४ लाख ४४ हजार ४१ रुपये मिळाले आहेत. म्हणजे या तिघांनी मिळून ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० रुपये गुंतवणुक केली होती. त्यातील १ कोटी ८४ लाख ४१ हजार त्याने परत केले असून १ कोटी ८३ लाख ६६ हजार रुपये इतकी रक्कम आरोपी कुशादेव याने परत केली नाही. निव्वळ चेक देवून तो पसार झाला आहे. त्यामुळे, या तिघांनी मिळून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.