Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळखला जाणारा अकोले विधानसभा मतदारसंघ एक महत्त्वाचा मतदारसंघ असून आतापर्यंत या मतदारसंघावर 40 वर्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निर्विवाद वर्चस्व आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यानंतर मात्र पिचड यांनी शरद पवारांची साथ सोडली व भाजपामध्ये प्रवेश केला होता.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांच्या विरोधात शरद पवार यांनी डॉक्टर किरण लहामटे यांना उमेदवारी दिली होती व तेव्हा वैभव पिचड यांचा पराभव करून डॉक्टर किरण लहामटे निवडून आले होते. परंतु आमदार किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी फुटीच्या वेळी अजित पवारांची साथ धरली व आता अकोले मतदारसंघातून ते उमेदवारी करत आहेत व त्यांच्यासमोर अमित भांगरे यांचे आवाहन आहे.
या ठिकाणी आता प्रचाराने मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून अमित भांगरे यांनी देखील गाव भेटी आणि प्रचार फेऱ्यांवर जास्त करून भर दिल्याचे दिसून येत आहे. या निवडणूक प्रचारादरम्यान अमित भांगरे यांनी डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून त्यांनी अनेक बाबतीत स्वतः शपथ देखील घेतलेली आहे.
यावेळी शपथ घेताना त्यांनी म्हटले आहे की मला येणाऱ्या काळामध्ये तिकीट मिळो अगर ना मिळो, राज्यात सत्ता येवो अथवा न येवो राज्यात किती जरी बदल झाला तरी देखील मतदारांच्या मूल्यांशी आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासाची कधीच गद्दारी करणार नाही अशा प्रकारची शपथ देखील त्यांनी घेतली.
अमित भांगरे यांनी केली डॉ. किरण लहामटे यांच्यावर टीका
या प्रचारादरम्यान अमित भांगरे यांनी डॉ. किरण लहामटे यांच्यावर टीका करताना म्हटले की, 2019 मध्ये त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांना देखील त्यांनी योग्य न्याय दिला नाही. त्यामुळे 90% कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यांनी अनेक बाबतीत जनतेच्या भावनांशी गद्दारी केली आहे.
ते म्हणतात की मी 2500 कोटी रुपयांचे कामे आणली परंतु त्यांनी फक्त नारळ फोडण्याचे काम केले व आकडे फुगवले आहेत. वास्तविक त्यांनी अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये इतका निधी आणलेला नाही. परंतु मी जर निवडून आलो तर येणाऱ्या काळात पाचशे कोटींपेक्षा जास्त निधी अकोले तालुक्याला आणून येथील आरोग्य,
शिक्षण तसेच पर्यटन, रोजगार तसेच महिलांची सुरक्षा व मुख्य गाव आणि शेत रस्ते तसेच पुलांची कामे इत्यादी प्रकारचे अनेक कामे करणार असल्याचे देखील अमित भांगरे यांनी म्हटले. त्यामुळे मला फक्त एकदा संधी द्यावी अशा प्रकारची विनंती देखील त्यांनी मतदारांना केली आहे.
डॉ. किरण लहामटे यांनी गेली साडेचार वर्ष बहुजन समाजाची केली अवहेलना- अमित भांगरे
तसेच अमित भांगरे यांनी डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर बोलताना म्हटले की, त्यांनी बहुजन समाजातील अनेकांची अवहेलना केली असून साडेचार वर्ष बहुजनांना त्यांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. परंतु आता मात्र बहुजनांच्या ताटाखाली मांजर बनून राहत आहेत.
परंतु हेच आमदार मांड्या थोपटून म्हणत होते की आमचा नाद करायचा नाही! अशा प्रकारचे सामाजिक विषमता कोणी पसरवली? असा देखील प्रश्न अमित भांगरे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की माझे वडील स्व. अशोकराव भांगरे यांनी अकोले तालुक्यातील बहुजन समाजाला धरून 1990 ते 2022 या मोठ्या कालावधीत तालुक्यात राजकारण केले व बहुजनांचे नेतृत्व केलेले आहे.
परंतु त्यांनी कधीही बहुजनांची लक्तरे वेशीवर टांगले नाहीत आणि विवाद निर्माण होतील असे कुठल्याही पद्धतीचे वक्तव्य कधीच केले नाही.
जेव्हा त्यांच्याकडून अशा प्रकारची चूक झाली असेल तेव्हा त्यांनी मोठ्या मनाने माफी देखील मागितली असल्याचे त्यांनी म्हटले. परंतु लहामटे आमदार झाल्यापासून बॅनर फाडाफाडी ते तोंडाला काळे फासण्यापर्यंत तर कधी लाथ मारण्यापर्यंत यांची मजल केल्याचे देखील त्यांनी म्हटले.
अमित भांगरे यांनी घेतली शपथ
ज्याप्रकारे लहामटे यांनी मतदारांच्या छाताडात लाथा आणि कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले आणि इतकेच नाही तर कार्यकर्त्यांना देखील त्यांनी वाऱ्यावर सोडले. परंतु मी अशा पद्धतीचे कुठलेही कर्तव्य करणार नाही. त्यांनी शपथ घेताना म्हटले की, मी उतनार नाही, मातणार नाही, घेतला वसा मी सोडणार नाही! पुरोगामी विचारांचा तसेच एकनिष्ठेचा,
समाजाशी बांधिलकीचा व तालुक्याच्या विकासाचा, रोजगार, आरोग्य, शिक्षणाचा आणि येथे संस्कृतीचा वसा घेऊन मी चालणार आहे असे देखील त्यांनी शपथ घेताना म्हटले. तसेच त्यांनी म्हटले की मला येणाऱ्या काळामध्ये तिकीट मिळो अगर ना मिळो, सत्ता येवो अथवा ना येवो, राज्यात किती बदल होओ परंतु मी मतदारांच्या मूल्यांशी आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासाशी कधीच गद्दारी करणार नाही.
50 खोके येवो किंवा शंभर खोके परंतु मी मतदार आणि कार्यकर्त्यांचा गळा घोटून स्वतःचे घर भरणार नाही. राज्यात आणि देशात कितीही विपक्ष परिस्थिती होऊ द्या मी मतदारांशी कधीही गद्दारी करणार नाही अशी देखील शपथ त्यांनी घेतली.
त्यानंतर त्यांनी पुढे म्हटले की शरद पवार साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब तसेच उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करणार असून तालुक्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी आणणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघातील मायबाप जनता मला संधी देईल याची मला खात्री असल्याचे देखील त्यांनी म्हटले.