अहमदनगर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सर्व जिल्ह्यात विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचच एक भाग म्हणून 22 ते 25 फेब्रुवारी, 2024 दरम्यान येथील भिस्तबाग महल समोरील मैदान, तपोवन रोडजवळ, सावेडी, अहमदनगर येथे ‘महासंस्कृती महोत्सव’ व कृषी व उमेद महिला बचतगट महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दि. 22 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा शुभारंभ होणार असुन या महोत्सवाचा जिल्हावासियांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विविध कला व संस्कृती जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असुन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9-00 ते 10-00 या वेळेत “महासंस्कृती महोत्सव शोभा यात्रा, ढोल पथक मिरवणूकीचे” आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 1-00 ते 2-00 या वेळेत नाट्य आराधना, अहमदनगर यांच्यावतीने “एक रात्र गडावर” हे बालनाट्य सादर केले जाणार आहे. दुपारी 2-30 ते 3-30 या वेळेत नृत्य झंकार, अहमदनगर यांच्यावतीने “महाराष्ट्रातील संस्कृती, विविध नृत्य अविष्कार” सादर होणार आहेत.
सायं. 4-00 ते 6-00 या वेळेत “महासंस्कृती महोत्सव उद्घाटन समारंभ”, आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे तर सायं. 7-00 ते 10-00 या वेळेत प्रशांत दामले, वर्षा ऊसगावकर यांची प्रमुख भुमिका असलेले “सारख काही तरी होतंय” या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11-00 ते दुपारी 1-00 या वेळेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत विविध “सांस्कृतिक कार्यक्रम” सादर केले जाणार आहेत.
दुपारी 2-00 ते सायं. 4-00 या वेळेत जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी विविध “सांस्कृतिक कार्यक्रम” सादर करणार आहेत. सायं. 4-00 ते 6-00 या वेळेत “नाना थोड थांबा ना” या नाटकाचे सादरीकरण होणार असुन सायं. 7-00 ते 10-00 या वेळेत नंदेश उमप हे “मी मराठी” हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या वेळेत लोणी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी “संभवामी युगे युगे” हे नाटक सादर करणार आहेत.
दुपारी 1-00 ते 3-00 या वेळेत कोपरगाव येथील संस्थेमार्फत “स्वर संगीत मैफिल महाराष्ट्राची लोकधारा” गीत गायन सादर होणार असुन सायं. 4-00 ते 6-00 या वेळेत पवन श्रीकांत नाईक, अँडी मकासरे व प्रिया ओगले-जोशी हे “संगीत फ्युजन” कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. रात्री 7-00 ते 10-00 या वेळेत “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम होणार आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 25 फेब्रुवारी 2024 सकाळी 11-00 ते दुपारी 1-00 या वेळेत संगमनेर महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी “जय जय महाराष्ट्र माझा” हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
दुपारी 3-00 ते 5-00 या वेळेत उमेद महिला बचत गटांना कर्ज व लाभ वाटप, महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला साहित्य व इलेक्ट्रिक घंटा गाडीचे वाटप होणार असुन सायं. 7-00 ते 10-00 या वेळेत “संगीत रजनी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बचतगटांचे स्टॉल, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पर्यटन, कृषी तसेच ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारे प्रदर्शनही याठिकाणी असणार आहे. चार दिवस सकाळी 11-00 ते रात्री 10-00 या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार असुन जिल्हावासियांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.