नगर शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांच्या गळ्यातील दागिने, मोबाइल हिसकावले .. !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर शहर परिसरात गेल्या २ दिवसांत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. सावेडी उपनगरात एकाच दिवशी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने २ ठिकाणी रस्त्याने पायी चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मोटारसायकलवर आलेल्या २ अज्ञात चोरट्यांनी हिसका मारून तोडून नेले.

तसेच मार्केट यार्ड चौकात रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलत असलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल एकाने हिसकावून पळवून नेला तर बस प्रवासात वृद्धाच्या बॅगमधून ११ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.

पहिली घटना भुतकरवाडी परिसरात घडली. अंजली अनिल धोडपकर या शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी भुतकरवाडी परिसरातील महादेव मंदिरात दर्शन करण्यासाठी गेल्या होत्या. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ६.४५ च्या सुमारास त्या घरी पायी जात असताना दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधलेले दोन इसम त्यांच्या जवळ आले.

काही कळायच्या आत त्यांनी अंजली धोडपकर यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची चेन ओरबाडून मनमाड रस्त्यावरील दीपक पेट्रोल पंपाच्या दिशेने धूम ठोकली.

दूसरी घटना सावेडी उपनगरात पाईपलाईन रस्त्यावर त्याच दिवशी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. सुजाता राहुल अष्टेकर या नातीसाठी दुकानातून चॉकलेट आणण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीसोबत श्रमिकनगरकडून पाईपलाईन रोडकडे पायी चाललेल्या होत्या.

त्यावेळी समोरून लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर दोन अनोळखी इसम आले. त्यातील मागे बसलेल्या इसमाने अष्टेकर यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमंतीचे मिनी गंठण हिसकावले व तेथून भरधाव वेगात पोबारा केला.

दरम्यान, एकाच दिवशी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने भूतकरवाडी व पाईपलाईन रोड या दोन ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेतील चोरटे एकच असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीकोनातून पोलीस तपास करत आहेत.

महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या या दोन घटना ताज्या असताना स्टेशन रस्त्यावर मार्केट यार्ड चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ मोबाईलवर बोलत असलेल्या मारुती बबनराव पाटोळे यांच्या हातातील मोबाईल मोटारसायकलवर आलेल्या एका इसमाने हिसका मारून पळविला.

परंतु पाटोळे यांनी आरडाओरडा केल्यावर पळून जाणाऱ्या चोरट्याला परिसरातील नागरिकांनी पकडले. त्याचे नाव सुरज विजय शिंदे (वय २१, रा. मार्केट यार्ड, नगर) असे असून त्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तर पुण्याहून नगर मार्गे अकोला येथे जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या वृद्धाच्या बॅगमधून ३ लाख ६८ हजार रुपये किमतीचे ११ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. २७) दुपारी घडली. याबाबत परमेश्वर गोकुळदास खंडेलवाल (रा. घोरपडी, पुणे) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खंडेलवाल हे बस प्रवासात असताना शिरूरपर्यंत त्यांच्या बॅगमध्ये दागिने होते. बस नगरमध्ये पुणे बसस्थानक व तेथून तारकपूर बसस्थानक येथे थांबली. तेथून निघाल्यावर त्यांना बॅगमधून दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe