Ahmednagar News : पूजा खेडकर प्रकरणावरुन आ.पंकजा मुंडे यांना ट्रोल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. खेडकर कुटुंबाने मुंडे यांना बारा लाख रुपये देणगी दिल्याचे निराधार वृत्त परविले जात आहे.
प्रसार माध्यमांतून काही विघ्नसंतोषी व विरोधकांनी खोट्या बातम्या देवून मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी खटाटोप चालविलेला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट असल्याची टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या खोटया प्रचारात कोणतेही तथ्य नसून आ. मुंडे यांना ट्रोल करण्याचे षडयंत्र आहे. आ.पंकजा मुंडे, विधान परिषदेवर निवडून गेल्या, त्याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन केले.
परंतू याचवेळी काही प्रसारमाध्यमातून सध्या सर्वत्र गाजत असलेल्या आयएएस पुजा खेडकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या अनुषंगाने, खेडकर दाम्पत्याने आ. पंकजा मुंडे यांना मदत म्हणून बारा लाखांचा चेक दिला व लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी मोहटादेवीला चांदीचा मुखवटा अर्पण केला.
याबाबतच्या सोशल मिडीया व विरोधकांकडून बातम्या प्रसारीत होत आहेत. लोकनेते गोपिनाथ मुंडे व आ. पंकजा मुंडे यांना मानणारा व त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा लाखोंचा चाहता वर्ग आहे.
शेवगांव-पाथर्डीसह, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर व अनेक जिल्ह्यांत त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे लोक आहेत. मुंडे कुटुंबीयांच्या सुख दुःखात ते त्यांच्या सोबतच असतात.
मध्यंतरी पंकजा मुंडेच्या साखर कारखान्याच्या जीएसटी व टॅक्सबाबतच्या नोटीसच्या बातम्या प्रसिध्द झाल्यावर आ. पंकजा मुंडे यांना असंख्य लोकांनी फोन करुन आम्ही मदत करु इच्छितो, तर काहींनी चेकही लिहून पाठवले, असे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांनी त्यांना चेक देवू केले होते.
त्यामुळे शेवटी आ. पंकजा मुंडे यांनी सांगितले की, आपण सर्व लोकांनी सहकार्यांची इच्छा व्यक्त केली, त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे.
तुमचे प्रेम हेच मला मोलाचे आहे. तुम्ही माझी खरी संपत्ती आहात, त्यामुळे अशी मदत मी स्वीकारु शकत नाही. तुमचे चेक मी घेवू शकत नाही, असे नम्रपणे स्पष्ट केले तसेच लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजाताई नगर- पाथर्डी मार्गे बीडला जाताना मोहटादेवी दर्शनाला आल्या. त्यावेळी माझ्यासह हजारो कार्यकर्ते तेथे होते.
त्यावेळी अचानक खेडकर यांनी सांगितले की, मी ताईंना उमेदवारी मिळण्यासाठी मोहटादेवीला नवस केला होता. त्यामुळे चांदीचा मुकुट अर्पण करीत आहे.
याबद्दल त्यांना काहीही माहीती नव्हती. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांच्या वैयक्तीक बाबीवरुन काही लोक व विरोधक आ. पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी हे कृत्य करुन सोशल मिडीयावर दाखवून ट्रोल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले.