‘त्या’ कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्यात नोकरी – आमदार रोहित पवार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- घोडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय अडसूळ यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

शासकीय मदत व कुटुंबातील एकाला साखर कारखान्यात नोकरी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार पवार यांच्या आश्वासनामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

सावकाराचे कर्ज व घोडेगाव सेवा संस्थेच्या थकलेल्या ८० हजारांच्या कर्जासाठी होणाऱ्या तगाद्यामुळे दत्तात्रय आडसूळ हे ऊसतोड सोडून गावी घोडेगाव येथे परतले.

सावकाराच्या तगाद्यामुळे जिरायत पावणेतीन एकर शेत विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला, परंतु सौदा फिसकटला. त्यामुळे हताश होऊन अडसूळ यांनी ८ जानेवारीला मध्यरात्री दोनच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली, पण प्रशासन निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असल्याने त्यांच्याकडे कोणी फिरकले नाही.

नंतर प्रशासनाने आडसूळ यांच्या घरी जाऊन पंचनामा केला व मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. आमदार रोहित पवार यांनी आडसूळ कुटुंबाला फोन करून सांत्वन केले होते.

१४ जानेवारीला भेट देण्यास येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आमदार पवार यांनी घोडेगाव येथे गुरुवारी भेट दिली.

शासकीय मदत मिळावी, यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करत कुटुंबातील एकाला साखर कारखान्यात नोकरी लावून देण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment