Ahmednagar News : एका इंग्रजी शाळेतील बस रस्त्याशेजारी असणाऱ्या खड्ड्यात घसरल्याची दुर्घटना घडली आहे. शाळेकडून घरी जात असताना ही घटना घडली असून यात जवळपास २० विद्यार्थी होते अशी माहिती समजली आहे.
घराकडे जात असतानाच ही दुर्घटना घडली. यामधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी : श्रीरामपूर तालुक्यातील डहाणूकर इंग्रजी शाळेतील बस जवाहरवाडी बेलापूर रस्त्याच्या दरम्यान अरुंद रस्ता असल्याने घसरल्याची घटना घडली. या बसमध्ये २०हून अधिक विद्यार्थी होते.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून बसचे किरकोळ नुकसान झाले आहे. ही बस शाळेतील मुलांना घेऊन निघाली होती. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने चालकास रस्त्याचा अंदाज आला नाही व गाडी रस्त्यावरून घसरली.
शुक्रवारी दुपारी टिळकनगर येथील डहाणूकर इंग्रजी शाळेची दुपारी तीनच्या सुमारास सुट्टी झाल्यानंतर बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी निघाली. जवाहरवाडी येथील रस्त्यावर समोरून रिक्षा आल्याने बस चालकाने बस डावीकडे घेताच पावसामुळे बसचा टायर घसरला आणि बस डावीकडील खड्ड्यात गेली.
विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. बस डावीकडून खड्ड्यात उतरल्याने विद्यार्थ्यांना डावीकडे असलेल्या दरवाज्यातून उतरता येत नव्हते. बस चालकाने मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजातून विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढले व तात्काळ शाळेतून
दुसरी बस बोलावून विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोच केले. घटना घडल्यानंतर विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर या ठिकाणी दोन क्रेनच्या साहाय्याने बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.