स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या पुढाकाराने अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी प्रांताधिकारी किरण सावंत यांना सर्वधर्मीय धर्मगुरुंनी नुकतेच निवेदन दिले.
श्रीरामपूर गुरुद्वाराचे धर्मगुरु बाबा मिस्किनजी, हनुमान मंदिर ट्रस्ट रेल्वे स्टेशन मंदिराचे हिंदू धर्मगुरु प्रल्हाद पांडेय, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अकबर अली, बौद्ध धम्म गुरु भन्ते मोगलयान, संत लोयला चर्चचे रे. फा. संपत भोसले, प्रजापती ब्रम्हकुमारी बी. के. मंदा, तुकाराम महाराज कदम, गोरक्षनाथ महाराज शिंदे, प्रमुख धर्मगुरू तसेच तेजस गायकवाड, रवी त्रिभुवन यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की येथील सर्व जाती-धर्माच्या अनुयायांची ४० वर्षापासून मागणी आहे की अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूरच जिल्हा करावा. तरी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा.
यावेळी मौलाना अकबर अली म्हणाले, की श्रीरामपूर जिल्हा करावा ही मागणी प्रत्येक श्रीरामपूरकारांच्या जिव्हाळ्याची आहे. गुरु बाबा मिस्किनजी आनोप सिंगजी म्हणाले, की श्रीरामपूर जिल्हा होणं अत्यंत गरजेचे आहे.
भन्ते मोगलयान म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा झाला तर सर्वधर्म पंथांच्या अनुयायांचे भले होणार आहे. तुकाराम महाराज कदम म्हणाले, की प्रभू श्रीरामाच्या नावाने असलेला श्रीरामपूर जिल्हा जाहीर करून राम भक्तांचा आशीर्वाद घ्यावा.
महानुभव पंथाचे बाबा म्हणाले, की श्रीरामपूर जिल्हा होणे गरजेचे आहे. गोरक्षनाथ महाराज शिंदे म्हणाले, की क्षेत्रफळाने अहमदनगर जिल्हा मोठा असून त्याचे त्वरित विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा.