शेवगावात थेट पोलिस महानिरिक्षकाच्या पथकाचा छापा ५५ जुगाऱ्यांसह ३५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-शेवगाव पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी नेमलेल्या पथकाने छापा टाकून तब्बल ५५ जुगार्‍यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ३५ लाख ८५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हा जुगार अड्डा नेवासा रोडवरील स्टेट बँकेच्या समोर रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेतील फिरोज इनामदार यांच्या मालकीच्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये सुरू होता. शेवगाव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्या पथकाने कारवाई केल्याने शेवगाव पोलिसांचा निष्क्रीय कारभार समोर आला असून, अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती की, शेवगाव शहरातील नेवासा रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या समोरील रोडलगत फिरोज ईनामदार यांचे मालकीचे पत्र्याचे बंद मोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची खबर विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांना समजल्यानंतर त्यांनी विशेष पथक तयार करून सदरील ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

यानंतर सपोनि. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र सोनवणे, पोना. नितीन सकपाळ, पोकाँ. उमाकांत खापरे, पोकाँ. विश्वेश हजारे, पोकाँ. चेतन पाटील, पोकाँ. अमोल भामरे, पोकाँ. नारायण लोहरे, पोकाँ. सुरेश टोंगारे यांच्या पथकाने सदरील ठिकाणी बुधवार दि. ९ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला.

यावेळी सदरील ठिकाणी जमिनीवर बसून काही लोक ५२ पत्त्यांच्या कॅटमधील अंकावर व चित्रावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना आढळुन आले. पथकाने छापा टाकून तब्बल ५५ जुगार्‍यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून २ लाख ७० हजार ३६० रुपये रोख रक्कम, ४ लाख ३९ हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली, २८ लाख रुपये किंमतीच्या कार व जीप, ७६ हजार ५०० रुपयाचे जुगाराचे साहित्य असा एकुण ३५ लाख ८५ हजार ८६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment