श्रीगोंद्यात भिंगान परिसरात ट्रॅक्टरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार !

Ahmednagarlive24 office
Published:
apghat

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान परिसरात ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

किशोर गायकवाड (वय ३२, रा. भिंगाण), असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुभाष गुलाब गायकवाड (वय ५५), रा. भिंगाण) यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान ते वऱ्हाड देवी रस्त्यावर दुपारी तीनच्या सुमारास घराच्या बांधकामासाठी सिमेंट गोण्या घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मडगार्डवर बसलेल्या किशोर गायकवाड या तरुणाचा तोल गेल्याने ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली व ट्रॅक्टरला जोडलेल्या डंपीग ट्रेलरच्या चाकाखाली जाऊन गंभीर जखमी झाला. डोक्याला जबर मार लागल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक दत्तप्रसाद उर्फ बाबु जगन्नाथ अधोरे (रा. भिंगाण), हा किशोर गायकवाड याला जागीच सोडून अपघात स्थळावरून पळून गेला. परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून पोलिसांशी संपर्क केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किशोर गायकवाड यांचा मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय आणून, त्यावर शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe