Ahilyanagar News: विधानसभा निवडणुकीला संपूर्ण राज्यांमध्ये आता रंगत येऊ लागली असून महायुतीच्या माध्यमातून भाजपाने पहिली यादी जाहीर केली.तसेच अजित पवार गटाकडून 17 जणांची यादी जाहीर करून एबी फॉर्म देखील देण्यात आले.
परंतु त्या तुलनेत मात्र महाविकास आघाडी कडून अजून देखील कुठल्याही प्रकारच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या नसल्यामुळे राज्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत इच्छुकांचे जीव मात्र टांगणीला लागल्याचे चित्र आहे.
तसेच अजित पवार गट आणि भाजपच्या माध्यमातून उमेदवारांच्या यादी जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडाचे निशाण फडकविण्यात आले. अशीच परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत असून येणाऱ्या काळात अजून काही ठिकाणी बंड होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवार गटाकडून जिल्ह्यातील तिघांना एबी फॉर्म
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे तसेच, अकोले मधून आमदार किरण लहामटे व शहरातील आ. संग्राम जगताप यांना एबी फॉर्म देण्यात आले. परंतु यामुळे आता महायुतीमध्ये नाराजी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
याचा फायदा आता शरद पवार घेणार व काहीतरी डाव नक्की टाकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बघितले तर महायुतीच्या माध्यमातून जवळपास आठ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत.
परंतु यामुळे शेवगाव मधून चंद्रशेखर घुले, कोपरगाव मधून विवेक कोल्हे आणि अकोलेतून वैभव पिचड मात्र नाराज असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर श्रीगोंदेतून अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्या ठिकाणाहून अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांनी थेट मशाल हाती घेण्याचे ठरवले असून यामुळे देखील आता मोठा पेच निर्माण होणार आहे
त्यामुळे या बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीला अथक परिश्रम करावे लागतील हे मात्र निश्चित.यासोबतच शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमधून भाजपने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली. परंतु अजित पवार गटाकडून मात्र चंद्रशेखर घुले या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत होते व त्यांची मात्र यामुळे निराशा झाली.
परंतु चंद्रशेखर घुलेंकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशीच काहिशी परिस्थिती अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. अकोलेतून अजित पवार यांनी किरण लहामटे यांना उमेदवारी दिल्यामुळे या ठिकाणहून भाजपकडून इच्छुक असलेले वैभव पिचड यांची मात्र निराशा झाली आहे. त्यामुळे या सगळ्या इच्छुक उमेदवारांची नाराजीची झळ महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुतीलाच नाहीतर महाविकास आघाडीला देखील जिल्ह्यातून काही ठिकाणी बंडाचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर तळपाडे यांनी पर्यायी पक्ष म्हणून मनसे कडून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
अहिल्यानगर शहर आणि श्रीगोंदाच्या जागेवर अजून देखील महाविकास आघाडीत एकमत झालेले नाही. परंतु आघाडीचा प्रत्येक घटक पक्ष आम्हाला जागा सुटेल या आशेवर तयारीला लागण्याचे सध्या दिसून येत आहे. असेच परिस्थिती अहिल्यानगर मतदार संघात देखील दिसून येत आहे.
अहिल्यानगर मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आल्याचे निश्चित असताना मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून ही जागा कुणाला सुटणार व उमेदवार कोण असणार? याबाबत मात्र अनिश्चितता आहे.