Ahmednagar News : तालुक्यातील अमरापूर येथील सुप्रसिद्ध असलेल्या रेणुका माता मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गणपत कुंडलिक केदार ( वय ४६, रा. हत्राळ, सैदापूर,पाथर्डी), अजय छबू चव्हाण (वय २७), जॅक्सन उर्फ किशोर पुंजाराम जाधव (वय ३४, दोघे रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे असून, या घटनेत दोन अल्पवयीन आहेत.
अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील १६ लाख ७६ हजार ४०० रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता. या प्रकरणी मंदिराचे पुजारी तुषार विजय वैद्य यांनी फिर्याददाखल केली होती.
फिर्यादीनुसार भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने बारकाईने केला. गणपत कुंडलिक केदार याच्याकडे चोरीच्या संशयाची सुई गेली. एलसीबीच्या पथकाने गणपत केदार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अजय चव्हाण, जॅक्सन जाधव अन्य साथीदारांच्या सहाय्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. शेतात पुरलेले मंदिरातील दागिने आरोपींनी काढून दिले. ७ लाख १९ हजार रुपये किंमतीचा पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला. कुंडलिक केदार व किशोर जाधव यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत २२ गुन्हे उघडकीस आले आहेत.