Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील खांडगाव शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ येथील चिमुकल्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे.
पाथर्डी तालुक्यातील खांडगाव शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक विजय अकोलकर गुरुजी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सदरचा गुन्हा खोटा असल्याचा दावा करत निलंबन झाल्यापासून करंजीसह दगडवाडी, भोसे, खांडगाव, सातवडसह परिसरातील नागरिकातून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
श्री. अकोलकर यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी या शाळेतील चिमुकल्यांनी शाळेवरच बहिष्कार टाकला आहे. गेल्या चार दिवसापासुन एकही विद्यार्थी शाळेत येत नाही. अकोलकर गुरुजी यांचे बेकायदेशीर निलंबन जोपर्यंत मागे घेतले जात नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निधार या शाळेतील चिमुकल्यांनी केला आहे.
या निलंबनाची कारवाई त्वरित मागे घ्यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित अधिकारी राहतील असा इशारा जोहारवाडी सोसायटीचे चेअरमन मच्छिद्र सावंत,
माजी सरपंच सुरेश चव्हाण, चांगदेव पवार, संतोष ससे, मुकुंद महाराज, रवीदेवा जोशी, भाऊसाहेब भंडारे, शिवनारायण ससे, महादेव चव्हाण, अशोक चव्हाण, अरुण शेरकर, बाळासाहेब चव्हाण, महेश दानवे, भारत ससे, गोविंद साळवे, संतोष चव्हाण, मिराजी तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी दिला आहे.
खांडगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय अकोलकर यांना निलंबित केलेल्या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याच्या घेतलेल्या निर्णयासंबंधी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाबाबत जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे – अनिल भवार, गट गटशिक्षण अधिकारी