Ahmednagar News : सध्या चोरटयांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. यापूर्वी शेळ्या, जनावरे, शेतीची अवजारे, विहिरीवरील पंप, केबल आदी साहित्याची चोरी तर नेहमीचीच बाब झाली आहे. त्यात परत मागील काही दिवसांपासून खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आदी कडधान्य देखील चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत .
दरम्यान सध्या बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी, संत्रा, डाळिंब, सीताफळ आदी फळबागाची लागवड केली आहे. सध्या डाळिंबाची फळे चांगली लगडली आहेत. तसेच बाजारात डाळिंबांना मागणी चांगली असून भाव देखील चांगले मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता फळ पिकांच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
सध्या डाळिंबाला चांगला बाजारभाव असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या बागांतून डाळिंब फळे चोरीच्या घटना वाढत आहेत.रात्री शेतकरी शेतात नसतात, त्यामुळे चोरटे रात्री बागांतून डाळिंब तोडून ते पोत्यांमधून भरून ते लंपास करतात. ही चोरी सहज करता येते व पैसादेखील चांगला मिळतो म्हणून डाळिंब बागा असलेल्या भागांत मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढू लागल्या आहेत.
या सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. फळपिके चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी बागांमध्ये रात्रीच्या वेळेस लपून त्यांच्यावर पाळत ठेवूनच होऊ शकतो. म्हणून अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी रात्रीच्या वेळेस बागांमध्ये थांबून राखण करत आहेत.
राहुरी तालुक्यातील धानोरे येथे देखील अशी घटना घडली आहे यात एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे डाळिंब चोरून नेले आहेत . हि घटना दि. १५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चेतन गोरक्ष दिघे ( वय ३२ वर्षे, रा. धानोरे, ता. राहुरी), यांनी धानोरे येथील हेमंत बाळासाहेब पिंपळे यांची शेती करायला घेतली असून त्या शेतात त्यांनी १ हजार ५०० डाळिंबाची झाडे लावलेली आहेत.
दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान चेतन दिघे यांनी डाळिंबाच्या फळांची पाहणी करून घरी गेले. त्यानंतर ते दि. १५ जूलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात डाळिंबाच्या फळांची पाहणी करण्याकरिता गेले असता बागेतील डाळिंबाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अज्ञात भामट्यांनी रात्रीच्या दरम्यान २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १३० कॅरेट डाळिंब चोरून नेले. चेतन गोरक्ष दिघे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.