Maratha Aarakshan Andolan : मराठा आरक्षण प्रकरणी नगर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले असून तालुक्यातील बहुतांशी गावांनी राजकीय नेत्यांना आपल्या सीमा बंद केल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेले मंत्र्यांचे पोस्टर्स आक्रमक होत आंदोलकांनी फाडले आहेत
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यातून पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीपासून जरांगे यांच्या भूमिकेला सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दिसून आला. दररोज नवनवीन गावांनी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. सुमारे ४० ते ४५ गावांचे दरवाजे राजकीय नेत्यांसाठी बंद झाले आहेत.

एकच मिशन मराठा आरक्षण या भूमिकेवर ठाम राहत सर्वच राजकीय पक्षांना मराठा समाजाने दूर सारले आहे. जो समाजाला मानत नाही.. त्याला समाज मानत नाही… अशा आशयाचे फ्लेक्स गावोगावी दिसून येत आहेत.
मराठा समाज आरक्षण प्रकरणी चांगलाच आक्रमण झाला असून समाजासाठी सर्वतोपरी योगदान देताना दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना न जुमानता आरक्षणासाठी एकवटला आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांचे नेतृत्व नाकारल्याचे चित्र गावोगावी लावण्यात आलेल्या फ्लेक्स वरून दिसून येते. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत असून आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
रविवारी (दि. २९) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सभा छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर येणार होते.
परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथे लावण्यात आलेले मंत्र्यांचे बॅनर मराठा समाजाच्या वतीने फाडण्यात आले.
मराठा आरक्षण प्रकरणी नगर तालुक्यातील आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चालल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांनी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच राजकीय पक्षांचे कार्यक्रम, सभा यावर बहिष्कार घालण्यात आलेला आहे.
साखळी उपोषण, आमरण उपोषण, कॅन्डल मार्च गावोगावी सुरू करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार होते. तसा त्यांचा अधिकृत दौराही जाहीर करण्यात आला होता.
कार्यक्रमस्थळी ना. दीपक केसरकर, ना. गिरीश महाजन, ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो असलेले फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यावर मराठा समाजाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत फ्लेक्स बोर्ड फाडले आहेत.
तसेच कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका घेतली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सर्वच नेत्यांनी कार्यक्रमाकडे जाण्याचे टाळले. नगर तालुक्यात बहुतांशी गावांनी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे.
सोशल मीडियावर मराठा आरक्षणाचे संदेश सर्वत्र फिरत असून विविध पक्षांच्या नेत्यांना ट्रोल करण्यात येत आहे. आरक्षणाची माहिती, आगामी भूमिका सोशल मीडिया मार्फत व्हायरल करण्यात येत आहे. सरकार तसेच आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या जात आहेत.