Ahilyanagar Breaking : जामखेड नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या जांबवाडी येथे आज (दि. १५) सायंकाळी ४.३० वाजता एका दुर्दैवी अपघातात चारचाकी वाहन विहिरीत पडल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या कामादरम्यान अपघात घडल्यामुळे चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने टाकलेल्या खडीमुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत कोसळले.
वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट विहिरीत कोसळली. अपघातग्रस्त वाहनात रामहरी गंगाधर शेळके (४०), किशोर मोहन पवार (२५), अशोक विठ्ठल शेळके (३५, सर्व रा. जांबवाडी), आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (रा. जामखेड) यांचा समावेश होता. चौघांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.
अपघाताची घटना रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पाहिली. त्यांनी तातडीने जामवाडी गावातील लोकांना बोलावले. गावातील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोरखंडाचा वापर करून विहिरीत उतरून चारही युवकांना बाहेर काढले.
“या विहिरीला पायऱ्या किंवा कठडा नव्हता, त्यामुळे वाहन थेट विहिरीत कोसळले. वेळेत मदत मिळाली असती, तर कदाचित जीव वाचले असते,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, तरुण, आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील मृतदेह रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि त्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
अपघात नेमका कसा घडला, याचा तपास पोलीस करत आहेत. वाहनावरील ताबा सुटण्यामागील कारण समजण्यासाठी पुढील चौकशी सुरू आहे.या दुर्दैवी घटनेने जांबवाडी आणि जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.