Ahilyanagar Crime : गांजा ओढण्यास मज्जाव केल्यामुळे वॉचमनवर चॉपर व कोयत्याने वार !

Mahesh Waghmare
Published:

२ जानेवारी २०२५, अहिल्यानगर : एका बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गांजा ओढण्यास मज्जाव केल्यामुळे वॉचमनवर चॉपर व कोयत्याने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोल्हेगाव परिसरात सोमवारी (दि.३०) रात्री घडली. करण संतोष कदम (वय १९, रा. टाकळी खातगाव, ता. नगर) असे जखमी वॉचमनचे नाव आहे.

उपचार घेत असताना तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी मंगळवारी (दि.३१) रात्री एका अनोळखी महिलेसह चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.बोल्हेगाव परिसरातील नायरा पेट्रोलपंपासमोर भंडारी कंन्स्ट्रक्शन यांची बांधकाम साईट सुरु आहे. या ठिकाणी करण कदम हा वॉचमन म्हणून काम करतो.

तो सोमवारी रात्री साईटवर जेवण करत असताना त्याच्याकडे २ अनोळखी इसम व १ महिला आली. ते त्यास म्हणाले की आम्हाला गांजा प्यायचा आहे, आम्हाला पाणी दे. त्यावेळी करण त्यांना म्हणाला तुम्ही येथे गांजा पिवू नका इथून निघून जा. या बोलण्याचा त्यांना राग आला व त्यांनी शिवीगाळ करत वाद सुरु केला.

त्यातील एकाने करण यास तोंडावर बुक्कीने मारले, तसेच महिलेने चापटीने मारले. त्यावेळी करण याने आरडा ओरडा केल्यावर ते तेथून मोटारसायकलवर बसून निघून गेले.थोड्या वेळाने पुन्हा तेथे दोघेजण आले, त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे इतर साथीदार होते.

त्यांनी आल्याबरोबर करण यास शिवीगाळ सुरु करत ही प्रॉपर्टी तुझ्या बापाची आहे काय ? असे म्हणत एकाने त्याच्या डोक्यावर चॉपरने वार केला. तर दुसऱ्याने कोयत्याने हल्ला केला तर चवथ्या साथीदराने दगडाने मारहाण करत जखमी केले.

यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अनोळखी महिलेने शिवीगाळ करत चापटीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोणारे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe