Ahilyanagar News:- बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा राज्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला व बरेच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून खरीप हंगामातील काढणीला
काही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या रब्बी पिके व कांद्याचे रोपवाटिकांचे देखील बऱ्याच ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली व डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर यामुळे फटका बसला आहे.
जिल्ह्यामध्ये 2022 पासून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. 2022 तसेच 2023 व आता चालू वर्षी 2024 च्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला होता व अशा परिस्थितीच ढगाळ वातावरण तयार झाले व काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी दाट धुक्याचा अनुभव आला.
त्यामुळे या हवामान बदलाचा खूप विपरीत परिणाम हा शेती पिकांवर पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाचे असलेल्या गहू पिकावर तुडतुडे तसेच हरभऱ्यासारखे पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची यामुळे शक्यता आहे. गेल्या 24 तासाच्या दृष्टिकोनातून बघितले तर जिल्ह्यात सहा मिलिमीटर पाऊस झाला असून कडाक्याच्या थंडीमध्ये अचानक ढगाळ वातावरण होऊन मंगळवारपासून थंडीत देखील घट झाल्याचे दिसून येत आहे.
साधारणपणे 2022 पासून अहिल्यानगर जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे व तेच चित्र या वर्षी देखील जिल्ह्यात दिसून आले आहे. त्यामुळे आता या सगळ्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे
गव्हाच्या पिकावर मावा, तुडतुडे आणि इतर अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये आता वाढ होईल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 24 तासात 6.7 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील श्रीरामपूर तसेच कोपरगाव, अकोले, राहता, संगमनेर, नेवासे, राहुरी,
शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली व या पावसाच्या विघ्नामुळे आता शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर संकट आले आहे.
गेल्या 24 तासात नगर शहरासह तालुक्यात सर्वाधिक 9.3 मिलिमीटर पाऊस झाला असून नेप्ती महसूल मंडळात सर्वाधिक 33.3 किलोमीटर पाऊस झाला तर त्या खालोखालच्या मंडळात 23.8, नालेगाव 6.5, सावेडी मंडळ आठ मिलिमीटर अशा पद्धतीने पाऊस झाला.
पुढचे तीन दिवस आहे तुरळक पावसाची शक्यता
अहिल्यानगर जिल्ह्यात पुढच्या तीन दिवसात तुरळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच सात व नऊ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल. थंडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे थंडीत घट कायम राहणार आहे.
कधी होतील नुकसानीचे पंचनामे?
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे आता कधी होतील याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. साधारणपणे मंत्रिमंडळ विस्तारानंतर या नुकसानीच्या पंचनाम्याला मुहूर्त मिळेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.