Shrirampur News : अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगर जिल्ह्यातच. पण याच जिल्ह्यात आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्यात देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे आणि त्यामुळे शेतकरी आता इतर पर्यायांचा विचार करत आहेत.
दरम्यान याच सहकारी साखर कारखान्याच्या या उदासीन धोरणाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी साखर कारखान्याच्या कारभारावर टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांनी, शेतकऱ्यांचे अशोक सहकारी साखर कारखान्यावर विशेष प्रेम आहे.
शेतकरी अशोकलाच ऊस पुरवठा करण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र उसाच्या दराबाबत साखर कारखान्याकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना सातत्याने कमी दर दिला जातो शिवाय ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांची पिळवणूक होते.
यामुळे आता शेतकरी इतर पर्यायाच्या शोधात आहेत अशी टीका भोसले यांनी यावेळी केली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी प्रवरेला ऊस पुरवठा करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.
यालाच उत्तर देताना भोसले यांनी ही टीका केली. यावेळी भोसले यांनी साखर कारखान्यावर काही गंभीर आरोप केलेत आणि काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणालेत की, अशोक वर 312 कोटींचे कर्ज आणि 262 कोटींचे देणे आहे, 28 कोटी रुपयांचा संचित तोटा आहे.
मग याची जबाबदारी कोणाची? अशोकला साखर तयार करण्यासाठी इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिकचा पैसा खर्च करावा लागतोयं. इतर साखर कारखान्यांना साखर तयार करण्यासाठी क्विंटल मागे 1604 रुपये खर्च करावे लागतात मात्र अशोकला 2770 रुपये खर्च करावे लागतात.
दुसरीकडे कारखान्याने जे उपपदार्थ तयार करण्यासाठी प्रकल्प तयार केले आहेत त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना होत नाहीये. अशोक कारखान्याकडून शेतकऱ्यांना प्रति टन 500 रुपये कमी दर मिळतोय.
असे असताना जर शेतकऱ्यांनी अशोकला ऊस द्यावा अशी मागणी होत असेल तर ही मागणी रास्त आहे का? असा सवाल भोसले यांनी यावेळी उपस्थित केलायं. शेतकऱ्यांना किमान गणेश कारखान्याप्रमाणे भाव दिला गेला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
कारखान्यातील कामगारांचे नऊ महिन्यांपासूनचे वेतन थकलेले आहे शिवाय त्यांच्या नावावर कर्ज काढले आहे. अतिरिक्त दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढले गेले आहे. यामुळे हे कर्ज कसे फेडणार आणि शेतकऱ्यांना उसासाठी काय भाव देणार हे कारखान्याने जाहीर करावे असे आवाहन यावेळी भोसले यांनी केले.