Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील देवरायांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्याच्या वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तालुक्यातील देवरायांना नवसंजीवनी मिळेल. यासोबतच, देवरायांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण होणार असून, त्यांची संख्या, क्षेत्रफळ, जैवविविधतेचे महत्त्व आणि इतर महत्त्वाच्या बाबींची नोंद होईल.
100 हून अधिक देवराया
देवराई म्हणजे समाजाने परंपरेने जपलेली आणि पवित्र मानली जाणारी जंगले. कळसुबाई ते भीमाशंकर या परिसरातील सुमारे ५० गावांमध्ये १०० हून अधिक लहान-मोठ्या देवराया आहेत. अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडी, पांजरे, सातेवाडी, फोफासंडी, लव्हाळी, कुमशेत आणि कोथळा यासारख्या गावांमध्ये या देवराया आढळतात. विशेषतः कुमशेत येथे ५, तर फोफासंडी येथे ६ देवराया आहेत. या देवराया जैवविविधतेचा खजिना असून, त्यांच्यामध्ये स्वतंत्र परिसंस्था विकसित झालेली आहे.

राज्यात साडेतीन हजारांहून अधिक देवराया
कोथळा येथील ‘भैरोबाची राई’ ही सुमारे २० एकर क्षेत्रफळाची देवराई जैवविविधतेने अत्यंत समृद्ध आहे. येथे लोध नावाचा विशाल वृक्ष आहे, जो या देवराईचे वैशिष्ट्य आहे. काही देवराया खासगी मालकीच्या असल्या, तरी त्यांचे नैसर्गिक वैभव अजूनही कायम आहे. मात्र, काळाच्या ओघात काही देवरायांचे वैभव कमी होत आहे. राज्यात अंदाजे साडेतीन हजारांहून अधिक देवराया असाव्यात, असे मानले जाते. या देवरायांची जंगले जैवविविधतेने नटलेली असून, पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि जैविक दृष्टिकोनातून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित करणार
या योजनेअंतर्गत, प्रत्येक गावातील देवरायांची अद्ययावत यादी तयार केली जाणार आहे. यासोबतच, भौगोलिक संदर्भासह नकाशे बनवणे, जैवविविधतेचे मूल्यमापन, वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींची विविधता, संख्या आणि रचनेची नोंद, तसेच दुर्मीळ, संकटग्रस्त आणि लुप्तप्राय प्रजातींची यादी तयार करून त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे याला प्राधान्य दिले जाईल. स्थानिक पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करणे आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन या क्षेत्रांना जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
या योजनेची अंमलबजावणी राज्य जैवविविधता मंडळ (नागपूर) यांच्या सचिवांच्या देखरेखीखाली होईल. याशिवाय, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांनाही काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. उत्तर सह्याद्रीतील कळसुबाई-भीमाशंकर परिसरातील देवराया या स्थानिकांनी जपलेल्या राईच्या रूपात ओळखल्या जातात. येथे सह्याद्रीच्या मूळ जंगलांचे स्वरूप या देवरायांमधून दिसते. या देवराया जागतिक स्तरावर लोकसंवर्धित क्षेत्र म्हणून महत्त्वाच्या मानल्या जातात. विविध वन्यजीवांचा अधिवास आणि त्यांचे भ्रमणमार्ग या देवरायांमुळे टिकून आहेत.
कम्युनिटी रिझर्व्ह’चा दर्जा
राज्य शासन स्थानिक समुदायांना प्रोत्साहन देऊन या देवरायांचे संरक्षण करू इच्छित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, या देवरायांना ‘कम्युनिटी रिझर्व्ह’चा दर्जा दिला जाऊ शकतो. शासकीय आणि अशासकीय घटकांना या जैविक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची ही उत्तम संधी आहे, असे देवराई अभ्यासक विजय सांबरे यांनी सांगितले. या योजनेमुळे अकोले तालुक्यातील देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन जैवविविधतेचा हा अनमोल ठेवा टिकवला जाईल, अशी आशा आहे.