Ahilyanagar News : नेवासाखुर्द येथे एका घराच्या कंपाउंडमधून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच याच ठिकाणी जवळील एका दुकानातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्ही तपासणी केली असता चोरटे यात कैद झाले आहेत. धक्कादायक म्हणजे चोरट्यांच्या हातात तलवार दिसून येत आहेत.
अधिक माहिती अशी : नेवासाखुर्द येथील पावन गणपती मंदिरासमोर राहणारे सुरज राज पटारे (वय 28) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 3 मे 2019 रोजी बजाज पल्सर 220 (गाडी क्रमांक MH 17 CG 3026) विकत घेतली होती, जी ते दररोज वापरत होते.

28 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजता त्यांनी ही मोटारसायकल त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये लावली आणि झोपी गेले. मात्र, 29 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजता त्यांच्या आजी आशाबाईंना गाडी दिसली नाही. त्यांनी घरातील सदस्यांना उठवून सांगितले, तेव्हा सर्वांनी बाहेर येऊन पाहिले असता मोटारसायकल गायब असल्याचे आढळले. शिवाय, कंपाउंडच्या स्लायडिंग गेटच्या छोट्या दरवाजाचे कुलूप तुटलेले होते.
याच परिसरातील विजय मच्छींद्र लोखंडे यांच्या ‘श्री पार्वती ऑईल अँड प्रोडक्ट’ या दुकानातही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुकानाच्या मागील दरवाजाचा कोंडा वाकवून चोरट्यांनी प्रवेश केला आणि तेलाच्या बाटल्या, तुपाचे डबे, गूळ तसेच रोख रक्कम 3,000 रुपये चोरून नेले.
दरम्यान, या घटनेबाबत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, तीन चोरटे चोरी करताना दिसले. त्यातील एकजण मोटारसायकलवर बसलेला होता, दुसरा चोर ती ढकलत नेत होता, तर तिसऱ्याच्या हातात तलवार होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ गाडीचा शोध लावावा आणि गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.