अहिल्यानगर- जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली 21 वी पशुगणना आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 98.29 टक्के गणना पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या गणनेचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे सादर झाल्यानंतर जिल्ह्यातील पशुधनाची संख्या वाढली की घटली, याची स्पष्ट माहिती समोर येईल.
दर पाच वर्षांनी होणारी ही देशव्यापी पशुगणना पशुधन व्यवस्थापन आणि धोरण आखणीला दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. 24 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू झालेल्या या गणनेत प्रथमच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

दर पाच वर्षांनी होते जणगणना
देशभरात दर पाच वर्षांनी एकाच वेळी राबवली जाणारी ही 21 वी पशुगणना 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ती अद्याप सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात या कामासाठी 365 प्रगणक आणि 93 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, गाढव, घोडा, खेचर, उंट, कुक्कुट पक्षी (कोंबडी, बदक, शहामृग, इमू, हंस), पाळीव कुत्रे, ससे, हत्ती तसेच भटके कुत्रे आणि गायी यांच्यासह 16 पशुधन प्रजातींची प्रजातीनिहाय, वयोगटानुसार आणि लिंगानुसार माहिती गोळा केली जात आहे.
जिल्ह्यातील 1,581 गावे आणि 290 नगरपालिका वॉर्ड अशा एकूण 1,871 ठिकाणी ही गणना होत असून, त्यापैकी 1,549 गावे आणि सर्व 290 वॉर्डांचे काम पूर्ण झाले आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
या पशुगणनेत प्रथमच मोबाइल अॅप आणि वेब-आधारित डॅशबोर्डद्वारे माहिती संकलन केले जात आहे. जिल्हा पशुगणना अधिकाऱ्यांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक प्रगणक ग्रामीण भागात 3,000 आणि शहरी भागात 4,000 कुटुंबांमागे नेमला गेला आहे.
ग्रामीण भागात 290 आणि शहरी भागात 56 प्रगणक कार्यरत आहेत, तर 93 पर्यवेक्षक त्यांच्या कामावर देखरेख ठेवत आहेत. हे प्रगणक घरोघरी भेट देऊन पशुधनाची माहिती अॅपद्वारे नोंदवत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे गणनेची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद झाली असून, चुका टाळण्यासही मदत होत आहे.
मागील आकडेवारी
20 व्या पशुगणनेनुसार (2019), अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 30 लाख पशुधन आणि 15 लाख कुक्कुट पक्षी होते. यंदाच्या गणनेत ही संख्या वाढेल की घटेल, याबाबत उत्सुकता आहे. शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात पशुधनाची संख्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे.
गणनेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पशुधनाच्या वाढीचे किंवा घटचे कारणे, प्रजातीनिहाय बदल आणि त्याचा स्थानिक अर्थकारणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास होऊ शकेल. यंदा भटक्या जनावरांचा स्वतंत्र डेटा गोळा केला जात असल्याने त्यांच्याशी संबंधित धोरणे आखण्यासही मदत होईल.