संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी परिसरातील जुन्या घाटामध्ये काल रविवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. सदर महिलेचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या चंदनापुरी घाटामध्ये श्री गणपती मंदिराच्या पाठीमागे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक इस्माईल शेख, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, अजय आठरे हे तातडीने घटनास्थळी गेले.
पोलिसांनी मृतदेहाची पहाणी केली असता, सदर मृतदेह हा १६ ते २५ वर्ष वयोगटातील महिलेचा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, या महिलेच्या हातावर गोंधलेले होते. अज्ञात आरोपींनी चंदनापुरी परिसरातील वन विभागाच्या गट नंबर ११६ मध्ये जंगलामध्ये नेऊन या महिलेचा खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर महिला आठ ते दहा दिवसांपूर्वी मयत झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.