पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (दि.३०) स्वतः गारपीटग्रस्तांच्या बांदावर जात नुकसानीची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या. योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान विखे पाटील याना समोर पाहून शेतकऱ्यांना रडू कोसळले होते. विखे यांनी त्यांचे सांत्वन केले. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक गारपीट पारनेर तालुक्यात झाली. तेथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वतः मंत्री विखे पाटील बांदावर गेले. गारपीटग्रस्त काही गावांना त्यांनी भेटी दिल्या.

परस्थीतीची माहिती करून घेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना विविध सूचना दिल्या. यावेळी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषदचे माजी सभापती काशिनाथ दाते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आदींसह अनेक कार्यकतें उपस्थित होते. यावेळी डॉ. आबासाहेब खोडदे यांनी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची मंत्री विखे पाटील यांना माहिती दिली. सरकारने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी एक ते सव्वा लाख रुपये नुकसानभरपाई दिली तरच शेतकरी समर्थपणे उभा राहील अशी मागणी केली.
शेतकऱ्याला रडू कोसळले :- वडुले येथील विजय पठारे यांचा ऊस तसेच डाळींबाचा बाग उध्वस्त झाला. या संकटामुळे व्यथीत झालेल्या विजय पठारे यांना मंत्री विखे पाटील हे उसाच्या शेतात पोहचल्यानंतर रडू कोसळले. विखे पाटील यांनी पठारे यांना शासन तुमच्या पाठीशी आहे असा धीर दिला.
काय म्हणाले विखे पाटील :- यावेळी मंत्री विखे पाटील यांनी शेताच्या बंदावर जाऊन पिकपाण्याची पहाणी केली. विखे पाटील यावेळी म्हणाले परस्थीती अत्यंत गंभीर आहे याची सरकारला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी विखे पाटील यांनी दिली.
गांजीभोयरे गावाचा समावेश वडझिरे मंडलात करावा :- गांजीभोयरे हे गाव जवळा मंडलात आहे. जवळा मंडलामध्ये कुकडी पट्ट्यातील गावे येतात. त्यामुळे पिकांच्या आणेवारीत शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे. त्यामुळे गांजीभोयरे या गावाचा समावेश वडझिरे मंडलात करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी विखे पाटील यांच्याकडे केली. विखे पाटील यांनीही दखल घेत तशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांना दिल्या.