Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर दक्षिण मधील कर्जत जामखेड मतदारसंघासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आई कामाख्या देवीने मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी दिली अशा चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्या आहेत.
खरं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जामखेड नळ पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. जामखेड शहरातील जनतेला गेल्या कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता.
मात्र आता लवकरच सामान्य जनतेचा हा प्रश्न निकाली निघणार आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी 138 कोटी रुपयांच्या योजनेला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. खरं पाहता या योजनेसाठी आमदार रोहित पवार यांनी प्रबल पाठपुरावा केल्याचे रोहित पवार समर्थकांकडून सांगितले जात आहे.
तसेच राम शिंदे हे मंत्री असताना कामासाठी पाठपुरावा केला असल्याचा तसेच नुकतेच राम शिंदे व भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेऊन सदर पाणीपुरवठा योजनासमवेतच तूकाई उपसा सिंचन योजनेसाठी देखील पाठपुरावा केल्याचे भाजपाकडून सांगितले जात असून राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री यांनी या 138 कोटींच्या योजनेला प्रशासकीय मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे.
एकंदरीत कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकारणी लोकांमध्ये भिडत लागली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड वासियांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न आता सुटणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पाणीपुरवठा योजने व्यतिरिक्त मलनिसारण योजना देखील जामखेड साठी मंजूर झाली आहे.
या योजनेसाठी 80 कोटी 34 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निश्चितच जामखेड शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे.