अहमदनगर ब्रेकिंग : संगमनेर, श्रीरामपूर, राहात्याला गारपिटीचा तडाखा !

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर शहर व तालुक्यात काल दुपारी वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाने हजेरी लावली. श्रीरामपूरबरोबर राहाता तालुक्यातील राजूर, ममदापूर, खंडाळा येथेही गारपीट झाली. संगमनेरच्या पठार भागालाही गारपीटीने झोडपले.कोपरगावात सायंकाळी अवकाळी पाऊस वरसला. गारपीटीसह आलेल्या अवकाळी पावसाने श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील रव्याच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा,  बेलापूर, खोकरसह अनेक शिवारात शेतात उभी असलेली पिके गारपिटीने भुईसपाट होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. बेलापूर शिवारातील कुल्हे  वस्ती, खोकर गोखलेवाडी, खंडागळे वस्ती, गायकवाड वस्ती परिसराला काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. यामुळे गहू, हरभरा, कांदा, मका आदी  पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

राहाता तालुक्यातील राजुरी व  ममदापूर परिसरात शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची  चांगलीच पळापळ झाली. राजुरी, ममदापूर व परिसरात शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. ममदापूर येथील आठवड़े बाजार असल्यामुळे बाजारकरूंचीही मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा, साकूर फाटा, चंदनापुरी घाट, कौठे मलकापूर, खंडेरायवाडी, जांभूळवाडीसह परिसरात काल शनिवार (दि.१७) दुपारी वादळी वान्यासह जोरदार गारपीट झाली. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यात काल शनिवारी दुपारी अर्धा तास गारांचा पाऊस  सुरू होता. दुपारी अचानक गारांचा  पाऊस सुरू झाल्याने परिसरात  शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजूरांची एकच धावपळ उडाली होती. तसेच गारपीटीने परिसरातील कांदा, हरभरा, मका, आदि पिकांचे नुकसान झाले असून शेत पिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. तसेच साकूर फाट्यावर महामागांवर गारांचा थर साचला होता.

कोपरगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल शनिवारी (दि. १८) सायंकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यावेळी शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या घास हिरावून पुन्हा नुकसानीचे संकट उभे राहिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe