‘टॉप १००’ स्वच्छ शहरांमध्ये अहमदनगरचा समावेश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : मागील तीन वर्षांपासून स्वच्छता सर्वेक्षणातील घसरलेल्या रँकिंगमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. मनपा पदाधिकारी व अधिकारी परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मागील दोन तिमाहीच्या रँकिंगमध्ये दहा लाखांच्या आत लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये क्रमांक आला आहे.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरांमध्ये स्वच्छताविषयक उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात घर ते घर कचरा संकलन व वाहतूकीसाठी खासगीकरणातून काम सुरु करण्यात आले आहे. तसेच मोकळ्या भूखंडावरील कचरा उचलण्यासाठी, कायम कचरा टाकल्या जाणाऱ्या जागांवर स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. पूर्ण क्षमतेने कचरा संकलन व्हावे, यासाठी नवीन वाहनांची खरेदी होणार आहे.

प्लॅस्टिक मुक्त शहरासाठी शासनाच्या निर्देशानुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे. तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खत प्रकल्प, हॉटेल वेस्ट, मृत जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमेंथानेशन प्रकल्प, मोठ्या मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनी, शहरात चार छोटे खत प्रकल्प, सेप्टीक टॅंक मधील उचलण्यात आलेल्या मैल्यावर प्रक्रियेसाठी एफएसटीपी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यातील काहींची कामे सुरू झालेली आहेत.

स्वच्छता ॲपचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. होम कंपोस्ट प्रकल्पासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून जनजागृती सुरु आहे. काही स्वयंसेवी संस्था, शाळा, बचत गट आदींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासाठी बैठक घेउन सूचना दिल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपाययोजनांसह नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याने स्वच्छता रँकिंगमध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे.

पहिल्या टप्प्यात झालेल्या ओडीएफ सर्वेक्षणात मनपाला ओडीएफ प्लस दर्जा मिळाला आहे. मागील दोन तिमाहीमध्ये स्वच्छता विषयी उपाययोजना प्रत्यक्ष अंमलबजावणी यात सुधारणा होत असल्याने देशातील दहा लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये नगरचा समावेश झाला आहे. पहिल्या तिमाहीत नगर शहर 78 व्या क्रमांकावर होते.

तर दुसऱ्या तिमाहीत नगर शहर 96 या क्रमांकावर असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निकालातून समोर आले आहे. सर्वेक्षणातील प्रमुख टप्पा असलेल्या ‘थ्री स्टार’ रँकिंगसाठी जानेवारी महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी मनपाकडून तयारी सुरू आहे. उपाययोजनांमध्ये सातत्य राहिल्यास व शहरातील स्वच्छतेमध्ये आणखी सुधारणा झाल्यास सर्वेक्षणाच्या अंतिम निकालातही नगर शहराचा पहिल्या शंभर शहरांमध्ये समावेश होऊ शकतो, असा विश्वास महापौर वाकळे व जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment