Ahmednagar City News :- अहमदनगर शहरात अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या वतीने एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल दिवस साजरा करण्यात आला. नवोदित खेळाडूंना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आणि एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांनी सुरु केलेल्या अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीत खेळाडूंसाठी फुटबॉलचे विविध उपक्रम राबविण्यात आले.
तर फुटबॉलचे सामने देखील रंगले होते. एएफसी हा आशियाई फुटबॉल महासंघ असून, महासंघाच्या वतीने 2013 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल दिवसचे हे दहावे वर्ष होते. सावेडी येथील अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीत झालेल्या या उपक्रमाचा खेळाडूंनी मनमुराद आनंद लुटला.
तर फुटबॉलचे थरारक सामने रंगले होते. या उपक्रमात शहरातील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अकॅडमीच्या शाखाप्रमुख पल्लवी सैंदाणे म्हणाल्या की, शहरात फुटबॉल खेळाला चालना देण्याचे काम अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून केले जात आहे. अनेक नवीन खेळाडू पुढे येत असून, त्यांना अद्यावत प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे.
मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना मैदानी खेळाकडे वळविण्याचा प्रयत्न असून, या चळवळीसाठी पालकांमध्ये देखील जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू तथा अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
तुरंबेकर यांनी फुटबॉल खेळाची तंत्रशुध्द माहिती देऊन नेतृत्व व खेळाचे कौशल्य विकसीत करण्याबाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या शाखाप्रमुख पल्लवी सैंदाणे, प्रशिक्षक अक्षय बोरुडे आणि अभिषेक सोनवणे यांनी परिश्रम घेतले. तर अकॅडमीच्या मुख्य प्रशिक्षका भक्ती पवार यांचे सहकार्य लाभले.