Ahmednagar City News : अहमदनगर महापालिकेच्या सभागृहात तीन वर्षांपूर्वी मराठा समाजाला जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव झाला. शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे महापालिकेचे अधिकारी आतापर्यंत सांगत होते.
सोमवारी (दि. २५) झालेल्या महासभेतही अशीच माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, असा कोणताच प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला नसल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२६) झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत समोर आला.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक अविनाश घुले, अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव, निखिल वारे, बाळासाहेब पवार, शाम नळकांडे, अमोल गाडे आदी नगरसेवक उपस्थित होते.
शासनाला प्रस्ताव पाठविल्याची खोटी माहिती सभागृहात दिल्याची कबुली नगररचना अधिकारी राम चारठाणकर यांनी बैठकीत दिली. त्यावर संतप्त झालेल्या नगरसेवकांनी चारठाणकर यांची चांगलीच कानउघाडणी केली.
श्री. चारठाणकर यांनी याबाबत माफी मागितली. आयुक्त डॉ. जावळे यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर नगरसेवकांची एक समिती तयार करून आणखी एक जागा निश्चित करून महासभेत ठराव करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
ही सर्व कार्यवाही ३० दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मराठा समाजाचा जागेचा प्रश्न ३० दिवसांत सुटला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या जागेचा प्रश्न सर्वच नगरसेवकांनी महासभेत उपस्थित केला. तो तीन वर्षांपासून दुर्लक्षित होता. समाजाचे सर्वच नगरसेवक या विषयावर आक्रमक झाले असून, त्यांनी महापालिका प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.