अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- दोन वर्षांपासून वीज बिल थकल्याने वीज कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
तसेच हातपाय तोडण्याची धमकी दिली. अहमदनगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील गोकुळवाडीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी शेख समीर बाबासाहेब दादामियाँ (रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) याच्याविरूद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वीज वितरणचे राजेंद्र भगवान पालवे (रा. निर्मलनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. तेलीखुंट कक्ष येथील कार्यालयात फिर्यादी पालवे व वायरमन सुभाष नामदेव उर्किडे हे कार्यरत आहे.
गोकुळवाडी येथील शेख समीर बाबासाहेब दादामियाँ याने वीज कनेक्शनचे बिल दोन वर्षांपासून भरले नव्हते. यामुळे पालवे व उर्किडे हे वरिष्ठांच्या आदेशाने शेख याचे वीज कनेक्शन कट करण्यासाठी गेले होते.
त्यांनी शेख याचे वीज कनेक्शन कट करताच त्याने पालवे व उर्किडे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. अंगावर धावून येत, वीज कनेक्शन जोडून द्या, अन्यथा हातपाय तोडण्याची धमकी दिली.
यावेळी पालवे व उर्किडे यांनी घाबरून शेख याचे वीज कनेक्शन जोडून दिले. पुन्हा माझ्या गल्लीत आला तर हातपाय तोडून नोकर्या घालण्याची धमकी शेख याने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम