अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : लाखो रुपये खर्च करुन पंधरा दिवसापुर्वी झालेला डिएसपी चौक ते तारकपूर रस्त्यावर बस स्थानक समोर मोठे खड्डे पडले असून, सदरील खड्डे लहान-मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
झालेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध नोंदवत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने खड्डयात रोप लावून व हार घालून गांधीगिरी करण्यात आली. तर शहर खड्डेमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरा लगत असलेले महामार्ग व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने न बुजविल्यास सात दिवसानंतर पुर्वसुचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिला आहे.
डिएसपी चौक ते तारकपूर रस्त्याची लाखो रुपये खर्च करुन दुरुस्ती करण्यात आली. मात्र दोन पावसातच या रस्त्याची अवस्था खड्डेमय बनली आहे.
नगर-मनमाड रोडवर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून, अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. यापुर्वी अपघातामध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे.
शहरामधील व महामार्गावरील असलेले खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने, वाहनचालकांना किमान खड्डे लक्षात येण्यासाठी खड्डयात झाडे लावून गांधीगिरी करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या आंदोलनात फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नासीर खान, संजय दिघे, नरेंद्र पवार, रिजवान पठाण, नितीन खंडागळे, शकील शेख, आमीर शेख आदिंसह स्थानिक नागरिक व फिनिक्सचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews