Ahmednagar News : नगर दौंड रोडवर बाबूर्डी बेंद (ता. नगर) फाट्याजवळ बुधवारी (दि. २८) सायंकाळी ६.३० च्या सुमरास भीषण अपघात झाला आहे. मोटारसायकल स्वाराला वाचवताना खाजगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या खाली जावून उलटली.
यात बस चालक आणि ज्याला वाचविण्याचा प्रयत्न केला तो मोटारसायकलस्वार असे दोघे जण ठार तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. खाजगी प्रवासी ट्रॅव्हल व मोटार सायकलस्वार दोघेही दौंड कडून नगरच्या दिशेने येत होते.
बाबूर्डी घुमट (ता. नगर) येथील मोटारसायकल चालक भाऊसाहेब दगडू येवले हे गावी जात असताना बाबूर्डी बेंद फाट्यावरून वाळकी रोड कडे वळाले. त्यांना वाचविण्यासाठी ट्रॅव्हल चालकाने जोराचे ब्रेक दाबले
पण बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या खाली जावून पलटी झाली. त्याच वेळी मोटारसायकल स्वार येवले हे बस खाली सापडले.
या अपघातात मोटार सायकलस्वार आणि ट्रॅव्हल चालक दोघे जण जागीच ठार झाल्याची माहिती समजली. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने मदत केली.
अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
या अपघाताची माहिती मिळाल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांना तसेच रुग्णवाहिकांना फोन करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यासाठी प्रयत्न केले.
सदर भीषण अपघात ज्या ठिकाणी झाला ते अपघात प्रवण क्षेत्र असून त्या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात होवून सुमारे २० ते २५ जणांचा बळी गेलेला आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा केली
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची दखल घेतली गेली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याचे संदेश कार्ले यांनी सांगितले.