Ahmednagar News : तापमानात आता वाढ होत आहे. उन्हाची काहिली वाढली आहे. अहमदनगरचे तापमान ३८ ते ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले, तीव्रता वाढली आहे. उष्णतेच्या झळा जर वाढल्या तर शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर त्याचा दुष्परिणाम होत असतो.
शरीराचे तापमान नियंत्रणात राहिले नाही तर आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतात. उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेकांना थकवा आणि उष्माघात जाणवतो. त्यामुळे खबरदारी चा उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आपल्या सर्व ९८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना येथे उपचार घेता येणार आहेत. एप्रिल व मे असे दोन महिने उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याने सर्वानीच काळजी घेणे गरजेच आहे.
उष्माघाताची लक्षणे काय आहेत?
मळमळ होणे, उलटी, हात-पायाला गोळे येणे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्चचित लाल होणे, बराच वेळ अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, खूप वेळ निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, घबराट आदी.
उष्णतेचा सामना करण्यासाठी काय करावे
सर्वात महत्वाचे म्हणजे भरपूर पाणी पिले पाहिजे, आहारात फळे व सलाडसारखे पदार्थ असावेत, ताक, लिंबूपाणी, लस्सी, ओआरएस असे लिक्विड पिले पाहिजे. वेशभूषेचा विचार केला सैल, हलके, फिक्या रंगाचे, सुती कपडे घातले पाहिजेत. फार गरज नसेल तर दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडू नये. दिवसातून किमान दोनदा थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे.
अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात उपचार कक्ष सुरू करण्यात आलेले आहेत. रुग्णांना उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले.