Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खुनासारख्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. आता तरुणाचा गळा कापून खून केल्याची घटना आता समोर आली आहे.
हा प्रकार नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात समोर आला आहे. शुक्रवारी (दि. १६) रोजी परिसरातील एक शेतकरी शेतात गवत कापण्याकरीता गेला असता तेथे त्यांना हा मृतदेह आढळून आला. सदरची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली.
त्यानंतर स्थानिक नागरिक, पत्रकार व पोलीस पाटलांनी सदरची माहिती पोलिसांना कळवली. त्यामुळे नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे, मनोज अहिरे, विकास पाटील हवालदार केदार, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल वैद्य, करंजकर, वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहिले असता, अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या पुरुष जातीच्या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार करून गळा कापून खून केल्याचे दिसून आले.
याबाबत पुनतगावचे पोलीस पाटील संजय वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, घटनेच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी भेट दिली आहे. पंचनामा, उत्तरीय तपासणी करण्यात आलेली आहे. सदर खूनाबाबत पोलिसांना धागेदोरे मिळाले असून खून्यापर्यंत पोलीस पोहचतील,
असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत.