अहमदनगरमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी ‘राडा’, बंदूक, तलवार, कोयत्याने हल्ले

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत चालला असल्याचे चित्र आहे. मारहाण करताना गुंड प्रवृत्तीचे लोक थेट बंदूक, तलवार, कोयत्याचा वापर करत असल्याचे चित्र आहे.

आता अहमदनगरमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी बंदूक, तलवार, कोयत्याने हल्ले करण्यात आल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत नगर शहर परिसरात रविवारी (दि. ११) रात्री दिल्लीगेट ते अमरधाम रस्त्यावर आणि दुसऱ्या घटनेत नगरजवळील शेंडी या गावात दोन युवकांवर तलवार, कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी जीवघेणे हल्ले झाल्याची घटना घडली.

या हल्ल्यात दोघे युवक गंभीर जखमी झालेले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूर्ववैमनस्यातून शेंडी (ता. नगर) येथील युवकावर चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. निखिल विजय बोरूडे (वय २१) असे जखमी युवकाचे नाव आहे.

त्याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज आजिज सय्यद, इरफान आजिज सय्यद, शहानवाज आजिज सय्यद व आसिफ  पठाण (सर्व रा. शेंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रविवारी सायंकाळी निखिल व त्याचा मित्र राज वंजारी शेंडी गावातील भैरवनाथ चौकात बसलेले होते. साडेसातच्या सुमारास अरबाजसह चौघे तेथे आले.
यापूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून अरबाज याने उलट्या कोयत्याने निखिलवर वार केले.

इरफान, शहानवाज, आसिफ यांनी निखिलला खाली पाडून धरून ठेवले तर अरबाज याने कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. या मारहाणीत निखिल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर हल्ला करणारे पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत नागपंचमीच्या दिवशी भरलेल्या कुस्त्यांच्या कार्यक्रमात गेला म्हणून युवकाला बंदुकीचा धाक दाखवून तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवनाथ छगन राठोड (वय २४, रा. वारूळाचा मारूती तालीम जवळ, नालेगाव) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.

त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द सोमवारी (दि.१२) खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमरत्न पुलकेश भिंगारदिवे (रा. वारूळाचा मारूती, नालेगाव), राहुल रोहकले (पूर्ण नाव नाही, रा. वाघ गल्ली, नालेगाव), मयुर साठे, गणेश पवार, यश पवार, ओम कंडागळे, हेमंत शेलार (पूर्ण नावे नाहीत, सर्व रा. म्युन्सिपल कॉलनी, तोफखाना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नवनाथ राठोड हे त्यांचे मित्र सचिन ठाणगे व प्रशांत भोसले यांच्यासोबत रविवारी (दि.११) रात्री १० वाजता दुचाकीवरून दिल्लीगेट ते अमरधाम रस्त्याने जात असताना गणेश मेडिकलच्या समोर ओमरत्न भिंगारदिवे हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह थांबलेला होता. त्यांनी नवनाथ व त्यांच्या मित्राला अडवले व म्युन्सिपल कॉलनी येथे शिवछत्र बिल्डींगच्या जवळ नेले.

ओमरत्न याने नवनाथला शिवीगाळ करून, ‘नागपंचमीच्या दिवशी वारूळाचा मारूती येथे भरलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात तू का गेला’ असे म्हणून कपाळाला बंदुक लावली. राहुल रोहकले याने नवनाथ यांच्या डोक्यात तलवारीने वार केला.

मयुर साठे याने धारदार वस्तूने पाठीवर वार केला. गणेश पवार, यश पवार यांनी लोखंडी रॉडने मांडीवर तर ओम कंडागळे, हेमंत शेलार यांनी लोखंडी रॉडने पाठीवर, कंबरेवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe