Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील घाडगे पाटील शाळेजवळ एका व्यावसायिकास चिरडण्याचा प्रयत्न झाला. अंगावर बोलेरो घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शंतनू पोपट वाघ (रा. नेवासा) असे या खडी क्रेशर व्यावसायिकाचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत शंतनू वाघ यांची चुलत बहीण श्रुती सौरभ पोखरकर यांनी फिर्याद दिली.
शंतनू वाघ यांचा खडका फाटा येथे खडी क्रेशरचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि.१६) नेहमीप्रमाणे सकाळी ९:३० च्या सुमारास खडका येथे असलेल्या खडी क्रेशरवर जाण्यासाठी ते दुचाकीने निघाले होते.
महिंद्रा बोलेरोने आपला कोणी तरी पाठलाग करीत असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी बहिणीला फोन करून जवळच्या नातेवाइकांना कळविण्यास सांगितले. काही मिनिटांतच शंतनूच्या फोनवरून बहिणीला पुन्हा कॉल आला; परंतु त्यावेळी शंतनू नाही तर दुसरी व्यक्ती समोरून फोनवर बोलत होती.
“तुम्ही या व्यक्तीचे नातेवाईक आहात का? याला एक महिंद्रा बोलेरो घाडगे पाटील शाळेजवळ धडक देऊन गेली”, असे समोरील व्यक्तीने सांगितले. शंतनूला प्रथम नेवासा फाटा येथील हॉस्पिटलमध्ये व नंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले आहे.
घटनेच्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी पांढऱ्या रंगाची बोलेरो नेवासा मार्केट यार्ड येथून पाठलाग करीत असल्याचे दिसून आले. शंतनू यांना कटकारस्थान करून जिवे ठार मारण्याचा उद्देश यातून दिसतो, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मुख्य सूत्रधारास लवकरच अटक…
गुन्हा नोंद झाल्यानंतर नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो व तिचा मालक आणि त्या मागील मुख्य सूत्रधार यांची ओळख पटलेली आहे,
असे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले. येत्या काही दिवसांतच बोलेरोचा मालक, कटामगील मुख्य सूत्रधार हे कायद्याच्या कचाट्यात येतील, असे त्यांनी सांगितले.