Ahmednagar News : थेट पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. ही घटना नगर तालुका पोलिस ठाण्यात घडली. पत्नी व मुलींना मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिस अटक करीत नसल्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलले असल्याचे समजले आहे.
सोमवारी (दि.१५) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात गोंधळ घालत विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रमेश नवल्या काळे (रा. देऊळगाव सिद्धी, ता.नगर) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाराचे नाव आहे.
रमेश काळे याचे गावात गायरान जमिनीच्या कसण्यावरून वाद आहेत. त्यातील श्रीमंत्या जीवलाल चव्हाण, आदेश केरू काळे, विनोद श्रीमंत्या चव्हाण (सर्व रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) यांनी दि. ३ जुलै रोजी रमेश काळे याची पत्नी व मुलींना मारहाण केली होती.
श्रीमंत्या चव्हाण याने तलवारीने वार केले होते. त्या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर याबाबत रमेशची पत्नी सावित्रा हिच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध मारहाणीसह आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत. सोमवारी (दि.१५) दुपारी १२ वाजता हवालदार माने पोलिस ठाण्यात काम करत असताना रमेश काळे तेथे आला. त्याने सदर आरोपींना पोलिसांनी अद्यपि अटक का केली नाही? असे विचारत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
नंतर त्याने आरडाओरडा करत गोंधळ घातला. त्याच वेळी त्याने बरोबर आणलेले विषारी औषध बाहेर काढून ते प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे असलेल्या हवालदार माने व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले. त्याच्याकडून विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली.
या प्रकाराबाबत हवालदार शिवाजी माने यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी रमेश काळे याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला.