भंडारदरा भरले ! शेतकऱ्यांनी फटाके फोडले, ‘हे’ धरणेही भरण्याच्या मार्गावर

उत्तर नगर जिल्हाला वरदान ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. आता निळवंडे धरण कधी भरते, याकडे उत्तर नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्हाला वरदान ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. आता निळवंडे धरण कधी भरते, याकडे उत्तर नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण काल संध्याकाळी १० हजार ५२० दशलक्ष घनफूट झाले. भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. गतवर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने पाठ फिरवली होती

, तसेच जायकवाडी धरणाच्या परिसरातही आभाळमाया कमी झाली असल्याने भंडारदरा धरणातुन जायकवाडीसाठी पाणी झेपावले गेले होते. त्यामुळे भंडारदरा धरण तळाशी जाऊन टेकले होते. जून महिना संपला तरी भंडारदऱ्याला पाऊस दाखल होण्याचे नाव घेत नव्हता. जुलै महिन्याच्या एक तारखेपासुनच भंडारदऱ्याला मान्सूनचे जोरदार आगमन झाले.

कधी पावसाचे तांडव सुरू राहिले तर कधी ढगफुटीसदृश पावसाने आपला हिसका दाखवला. अखेर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा २ ऑगस्ट रोजी १० हजार ५०० दशलक्ष घनफूट झाला आणि भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्‌या भरले.

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्‌या भरल्याची घोषणा जलसंपदा विभागाकडून केली गेलेली नसली, तरी धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट होताच तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे मानले जाते.
गुरुवारी मध्यरात्रीपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातुन बुधवारी दुपारी ४ वाजल्यापासून टप्प्याटप्याने पाण्यात वाढ करत विसर्ग वाढविण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून ३ हजार ८८१ क्यूसेक व वीज निर्माण केंद्रातून ८२१ क्युसेक्स असा एकूण ४ हजार ७११ क्यूसेक विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे.

त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय बाढ होत असून संध्याकाळी सहा वाजता निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५ हजार ३० दशलक्ष घनफूट झाला आहे. निळवंडे धरण ६०.४० टक्के भरले आहे. शुक्रवारी भंडारदऱ्याला जोरदार पाऊस कोसळला.

गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ५२ मीमी पाऊस पडला असून घाटघर येथे ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रतनवाडी ९३ मिलिमीटर तर पांजरे येथे ८५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe