Ahmednagar News :- नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा व बँकेच्या संचालकपदाचाही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बँकेतील सत्ताबाह्य केंद्राशी झालेल्या वादातून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते.
दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्य संगीता गांधी यांनी याआधीच संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आता अग्रवाल यांनीही संचालकपद सोडल्याने बँकेच्या संचालकांमध्ये फूट पडल्याचे उघड झाले आहे.


सोमवारी दुपारी बँकेमध्ये अग्रवाल यांच्यासह माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यात या विषयावरून जोरदार खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी अग्रवाल यांनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा व संचालक पदाचा राजीनामा दिला.
मागच्या आठवड्यात बँकेचे कर्जतचे खातेदार बँकेसमोर उपोषणास बसले होते. रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने या खातेदारांना त्यांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नसल्याने हे निर्बंध उठवावे अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनास बँकेचे संचालक गिरीश लाहोटी यांनी पाठिंबा देताना बँकेचे अध्यक्ष अग्रवाल यांच्यावर निष्क्रीयतेचा तसेच त्यांच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप केला होता.