Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील संत शेख महंमद महाराज यांच्याबद्दल सर्वच धर्मियांच्या मनात आदर आणि भक्ती आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक अशी या स्थळाची ओळख.
दरवर्षी संत शेख महंमद महाराज यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने जात असते. सर्वच जाती धर्मांत या पवित्र स्थळाबाबत भक्तीची भावना आहे. असे असतानाही काही समाजकंटकांनी संत शेख महंमद महाराज यांच्या विषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली.
या प्रकरणी तिघांविरोधात पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मदन जैस्वाल, प्रशांत भालतोडकर, दिनेश पाटील (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
श्रीगोंदा येथून संत शेख महंमद महाराज यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने चालली आहे. सर्व जाती-धर्मातील वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत. अशा परिस्थितीत तीन समाजकंटकांनी सोशल मीडियावरील ‘वारकरी संप्रदाय’ या ग्रुपवर, अशी वादग्रस्त पोस्ट केली.
त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. या समाजकंटकांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सध्या संत शेख महंमद महाराज यांची दिंडी इंदापूर तालुक्यात आहे. दिंडीत जवळपास दोन हजार वारकरी सहभागी झाले आहेत.
ही वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर आल्याचे समजताच घनश्याम शेलार, नानासाहेब कोंथिबिरे, अशोक आळेकर, सुदाम झुंजरूक, शहाजी खेतमाळीस, सतीश मखरे, नवनाथ दरेकर यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. अशोक आळेकर यांनी लेखी तक्रार दिली.
त्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांची सायबर क्राईमची टीम या गुन्ह्याचा छडा लावणार असल्याचे सांगण्यात आले.